न्यू जर्सी नाटय़संमेलनाच्या खर्चाबाबत नाटय़निर्माता संघाचा टोला
अमेरिकेतील न्यू जर्सी येथे झालेल्या ९० व्या नाटय़संमेलनाला नाटय़सृष्टीशी संबंधित नसलेल्या अनेकांची खोगीरभरती होती. या सर्वाचा खर्च कोणी केला, त्यांचा नाटय़संमेलनाशी काय संबंध हे अनेक प्रश्न आज तीन वर्षांनीही अनुत्तरीत आहेत. त्यामुळे तत्कालीन नाटय़परिषद अध्यक्ष मोहन जोशी यांनी या प्रश्नाला हास्यास्पद म्हणणे योग्य नाही, असा पवित्रा नाटय़निर्माता संघाने घेतला आहे. याबाबतचे वृत्त ९ जानेवारीच्या ‘लोकसत्ता’च्या अंकात प्रकाशित झाले होते. हा खर्चाचा तपशील पत्रकार परिषदेत उघड केल्याचा दावा तत्कालीन अध्यक्ष करत असतील, तर मग नाटय़निर्माता संघाने वारंवार मागणी करूनही हा तपशील आम्हाला का मिळाला नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
अमेरिकेत नाटय़संमेलन होणे ही बाब मराठी नाटय़सृष्टीसाठी नक्कीच गौरवास्पद आहे. मात्र मुख्य म्हणजे धर्मादाय आयुक्तांनी अमेरिकेत संमेलन घेऊ नये, अशा स्पष्ट सूचना केल्या होत्या. त्यांच्या सूचनांचा उपमर्द करून संमेलन कसे घेण्यात आले, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे या संमेलनासाठी भारतातून अंदाजे १२० लोक उपस्थित होते. या लोकांपैकी अनेक लोकांचा नाटय़सृष्टीशी काहीच संबंध नसल्याचे उघडकीस आले होते. यापैकी किती लोकांचा खर्च नाटय़परिषदेने केला होता, किती लोक स्वत:च्या खर्चाने आले होते याचा तपशील नाटय़निर्माता संघाने वारंवार मागितला होता.
आम्ही वेळोवेळी नाटय़परिषदेला पत्र लिहून या संमेलनाबाबत माहिती मागवली होती. मात्र या सर्व प्रश्नांना उत्तर म्हणून परिषदेने केवळ ११७ नावे असलेली एक यादी पाठवली. या यादीतील बऱ्याच नावांचा प्रत्यक्ष नाटकाशी काहीच संबंध नाही, हेदेखील लक्षात येत होते, असे नाटय़निर्माता संघाचे सचिव दिलीप जाधव यांनी स्पष्ट केले. तर, मोहन जोशी यांनी त्यांच्या जवळच्या अनेक लोकांना अमेरिकावारी घडवून आणली होती. पैशाची अफरातफर झाली नसली, तरी अशा प्रकारे लोकांचा पैसा पाण्यासारखा खर्च केला गेला, असा आरोप नाटय़निर्माता संघात बडय़ा पदावर असलेल्या एका माजी पदाधिकाऱ्याने केला.
हा सर्व खर्च लेखा परीक्षण करून आपण पत्रकार परिषदेसमोर जाहीर केल्याचे मोहन जोशी सांगत आहेत. मग परिषदेच्या तत्कालीन अध्यक्षांनी नाटय़निर्माता संघाने पाठवलेल्या पत्रांना उत्तरे का दिली नाहीत? की, नाटय़निर्माता संघ नाटय़परिषदेच्या खिजगणतीतही नाही, असा प्रश्न दिलीप जाधव यांनी विचारला आहे.