डोंबिवलीतील ‘ह’ आणि ‘ग’ प्रभाग कार्यालयानंतर अनधिकृत बांधकामांचे आगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कल्याण पूर्वेत पालिका ‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर मोठय़ा प्रमाणात रस्त्याच्या बाजुला अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. विशेष म्हणजे प्रभाग कार्यालयातील अधिकारी, महापौरांच्या नेहमीच्या ये-जा करण्याच्या मार्गावरच ही अनधिकृत बांधकामे सुरू असल्याने नागरिकांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
‘ड’ प्रभाग क्षेत्र कार्यालय, विठ्ठलवाडी ते श्रीराम सिनेमापर्यंत ही अनधिकृत बांधकामे रस्त्याच्या दुतर्फा सुरू आहेत. या भागातील संतोषीमाता मंदिरासमोर एक अनधिकृत बांधकाम रस्त्याच्या कडेला सुरू आहे. अन्य बांधकामेही तेवढीच जोमाने सुरू आहेत. या बांधकामांना पालिकेची कोणतीही परवानगी नसल्याचे सांगण्यात येते. एका पालिका पदाधिकाऱ्याच्या नातेवाईकाच्या आशीर्वादाने ही सर्व बांधकामे सुरू असल्याचे सांगण्यात येते. या अनधिकृत बांधकामांच्या रस्त्यावरून दररोज पालिकेचे प्रभाग अधिकारी येजा करतात. त्यांचेही या बांधकामांकडे दुर्लक्ष होत असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याबाबत प्रभाग अधिकारी परशुराम कुमावत यांनी सांगितले, पुना लिंक रस्ता रूंदीकरण करताना दोन वेळा या भागातील बांधकामे पाडण्यात आली आहेत. दोन वेळा येथील रहिवासी विस्थापित झाले आहेत. बेघर असलेले हे रहिवासी त्यांच्या उपलब्ध जागेत बांधकामे करीत आहेत. या रहिवाशांना किती वेळ रस्त्यावर राहू द्यायचे त्यामुळे ऐपतीप्रमाणे ही मंडळी उपलब्ध जागेत निवारा बांधत आहेत.