16 December 2017

News Flash

वर्षभरात नागपुरात बलात्काराचे शतक, विनयभंगाचे द्विशतक

बालिका, तरुणी वा महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडतच असून नागपुरात बलात्काराच्या घटनांची आकडेवारी शतकाच्या

खास प्रतिनिधी, नागपूर | Updated: December 17, 2014 7:44 AM

बालिका, तरुणी वा महिलांवरील अत्याचाराच्या घटना सातत्याने घडतच असून नागपुरात बलात्काराच्या घटनांची आकडेवारी शतकाच्या उंबरठय़ावर तर विनयभंगाच्या घटनांनी द्विशतक गाठले आहे.
नवी दिल्लीत बसमधून मित्रासह घरी परतणाऱ्या एका निर्भयावर एका टोळक्याने मारहाण आणि सामूहिक अत्याचार केला. या गंभीर जखमी झालेल्या या तरुणीवर भारत व सिंगापूर येथे वैद्यकीय उपचार करण्यात आले. मात्र, तेरा दिवसांनी तिचा मृत्यू झाला. घटनेला मंगळवारी दोन वर्षे पूर्ण झाली. या घटनेने सारे जग हादरले. त्यानंतर कायदे कडक झाले तरी महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी झालेले नाही. उलट ते वाढतच आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील कळंबमध्ये मंगळवारी सकाळी दहावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीवर अत्याचाराची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी वसतिगृहाची वार्डन व सुरक्षा रक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. नागपूर शहरात सरासरी दोन दिवसांनी विनयभंग व अत्याचाराच्या घटना घडतच आहेत. रस्त्याने जात असलेल्या तरुणी वा महिलेची छेडछाड नित्याचीच झाली आहे. घरात शिरून विनयभंगाच्याही घटना घडतात.
विनयभंग व अत्याचार आजच होतात, असे नाही. पूर्वीही या घटना घडत होत्या. मात्र, वरिष्ठांचा धाक अथवा बदनामीच्या भीतीने त्या चव्हाटय़ावर येत नव्हत्या. मात्र, गेल्या पाच-सात वर्षांत या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दिल्लीतील घटनेनंतरही याचे प्रमाण कमी झालेले नाही. अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यासंबंधी झालेल्या जनजागृतीमुळेही पीडित न घाबरता तक्रार देण्यासाठी पुढे येऊ लागले आहेत. दिल्लीतील घटनेनतर महिलांविषयक कायदे अधिक कडक करण्यात आले. अ‍ॅसिड फेकल्यास किमान दहा वर्षे कारावास किंवा जन्मठेप दंड तसेच पीडितेचा वैद्यकीय खर्च, अ‍ॅसिड फेकण्याचा प्रयत्न केल्यास किमान पाच ते सात वर्षे कारावास व दंड अशी ही शिक्षा आहे. अश्लील हावभाव, इशारे, वर्तन, अश्लील चित्र दाखविणे, शारीारिक सुखाची मागणी करणे, शारीरिक स्पर्श आदी बाबी लैंगिक छळ समजून त्यासाठी पाच वर्षेपर्यंत सश्रम कारावास, किंवा दंड, गंभीर प्रकारासाठी एक वर्षे कारावास किंवा दंड किंवा दोन्ही, अश्लील छायाचित्र काढणे वा संगणकावर पाठवल्यास किमान तीन ते सात वर्षे कारावास व दंड, एकांतात असलेल्या महिलेस न्याहाळणे वा छायाचित्र काढल्यास पहिल्या गुन्ह्य़ासाठी किमान एक ते तीन वर्षे कारावास व दंड, त्यानंतरच्या गुन्ह्य़ास किमान तीन ते सात वर्षे कारावास, दंड, वारंवार पाठलाग करणे, दूरध्वनी करणे वा मेल पाठविल्यास किमान एक ते तीन वर्षे कारावास व दंड आदी तरतूद कायद्यात २०१३ मध्ये करण्यात आली आहे. बलात्कार (रेप) शब्दाऐवजी हा ‘लैेंगिक हल्ला’ अशी सुधारणाही कायद्यात करण्यात आली आहे.
कायदे कडक करूनही विनयभंग वा अत्याचाराच्या घटनांवर अंकुश लागू शकलेला नाही. नागपूर शहरात जानेवारी ते जुलै २०१४ या सात महिन्यातच बलात्काराच्या ६४ घटना तर विनयभंगाच्या १८१ घटना घडल्या. जुलै २०१३ पर्यंत हाच आकडा अनुक्रमे ५२ व २०१ होता. जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१४ पर्यंत बलात्काराच्या ९५ घटना घडल्या. त्यापैकी ९३ घटनांचा तपास लागला. विनयभंगाच्या २६१ घटना घडल्या. त्यापकी २५४ घटनांचातपास लागला. गुन्ह्य़ांची संख्या वाढतच असून पोलिसांचा नसलेला धाक आणि खालावलेली मानसिकता आदी कारणे यामागे असल्याचे लोक बोलू लागले आहेत. कायदा अधिक कडक केला गेला असला तरी त्याचे भय आरोपींमध्ये राहिलेले नाही. पकडले गेलो तरी चार पैसे फेकले की सुटून जाऊ, अशी गुन्हेगारांची मानसिकता झालेली असल्याचे लोक उघडपणे बोलू लागले आहेत.

First Published on December 17, 2014 7:44 am

Web Title: increasing numbers of rape sexual assault in nagpur