लातूर पॅटर्नचे नाव देशभर गाजवणाऱ्या दयानंद शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी आगळावेगळा उपक्रम हाती घेतला आहे. सुमारे १३ तास विद्यार्थी महाविद्यालयातच राहतील, याकडे याअंतर्गत लक्ष दिले जात आहे.
विज्ञान शाखेत प्रवेशानंतर विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे मोठे ओझे असते. अपेक्षापूर्तीसाठी महाविद्यालयीन वेळ वगळता उर्वरित तितकाच वेळ मुले शिकवणीस देतात. त्यातून अभ्यासासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळत नाही. या पाश्र्वभूमीवर गरजू, तसेच शिक्षणाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयानेच विशेष लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. जे विद्यार्थी शिकवणीला जातात त्यांचे वर्गात लक्ष राहात नाही, त्यांची उपस्थितीही कमी असते. दहावीला जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणांची टक्केवारी बारावीला मात्र कमी झालेली आढळते. त्यातून अभियांत्रिकी, वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळण्यात त्यांना अडचण येते.
दयानंद शिक्षण संस्थेच्या चालकांनी प्राध्यापकांना सोबत घेऊन देशपातळीवर चांगल्या चालणाऱ्या संस्थांमध्ये नेमके काय उपक्रम सुरू आहेत, याच्या अभ्यासासाठी ८ प्राध्यापकांचे पथक हैदराबाद, बंगळुरू, कोटा, दिल्ली अशा वेगवेगळय़ा ठिकाणी पाठवले. तेथे राबविल्या जात असलेल्या उपक्रमांची चर्चेतून माहिती घेतली. स्थानिक विद्यार्थ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन स्वतंत्र उपक्रम राबविणे सुरू केले. बारावीनंतर विविध ठिकाणी द्याव्या लागणाऱ्या प्रवेशपूर्व परीक्षांमध्ये चांगले यश मिळवायचे असेल, तर स्वअध्ययनाची सवय लावून घेणे महत्त्वाचे ठरते. महाविद्यालयातील सुमारे १ हजार २०० विद्यार्थ्यांपकी अनेकांची क्षमताधिष्ठित परीक्षा घेऊन १५० विद्यार्थी निवडले. या विद्यार्थ्यांना आयआयटी व एआयपीएमटीच्या तज्ज्ञ प्राध्यापकांचे सकाळी साडेचार तास व दुपारी सव्वातीन तास मार्गदर्शन सुरू केले. आयआयटीची तयारी करून घेण्यासाठी बाहेरील तज्ज्ञ प्राध्यापक व बोर्डाची तयारी महाविद्यालयातील प्राध्यापक करून घेतात.
कोटा, हैदराबादच्या नामांकित संस्थेत १० ते १५ वष्रे आयआयटी, एआयपीएमटी परीक्षेत शिकवण्याचा अनुभव असलेले तज्ज्ञ प्राध्यापक येथे नियुक्त केले आहेत. पालकसभा घेऊन पालकांनाही विश्वासात घेतले गेले. पालकांना बोर्डाच्या परीक्षेत मिळणाऱ्या कमी गुणांची चिंता असते. त्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक स्वतंत्र तयारी करून घेतात. विद्यार्थ्यांची तज्ज्ञ प्राध्यापकांकडून तयारी करून घेऊन रोज गृहपाठ दिला जातो. विद्यार्थ्यांने शिकवणी न लावता या उपक्रमात सहभागी व्हावे, इतकीच महाविद्यालयाची अपेक्षा आहे. हा उपक्रम राबवताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क घेतले जात नाही. त्यांचे अभ्यासात लक्ष लागावे, ताणतणाव कमी व्हावा यासाठी शारीरिक व मानसिक विकासाचे उपक्रमही राबवले जातात. पहिल्या १५० विद्यार्थ्यांचा प्रयोग यशस्वी झाला. पालकांच्या आग्रहाखातर पुन्हा १५० विद्यार्थ्यांची नवी बॅच सुरू करण्यात आली.
‘दयानंद’मध्ये अकरावी-बारावीचे ३ हजार विद्यार्थी आहेत. पुढल्या वर्षी सर्व विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यास संस्था आतापासूनच तयारी करीत आहे. संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी, सचिव रमेश बियाणी व प्रशासकीय अधिकारी प्रा. दासराव सूर्यवंशी निष्ठेने हा उपक्रम चालवत असून यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता चांगली वाढेल, असा त्यांचा विश्वास आहे. शिकवणी लावणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांचीही यामुळे चांगली सोय झाली आहे.