जगातील ३६ देशांच्या दूतावासातील अधिकाऱ्यांच्या राहण्याची तसेच कामाची एकाच ठिकाणी व्यवस्था होईल, असा जागतिक दर्जाचा आंतरराष्ट्रीय दूतावास केंद्र उभारण्याचा सिडकोचा मानस धुळीस मिळाला असून या प्रकल्पाला विविध देशांचा प्रतिसाद मिळत नसल्याने हा प्रकल्प गुंडाळण्याचा सिडको प्रशासन विचार करीत आहे. या राखीव २७ हेक्टर जागेवर मध्यम व उच्चभ्रू नागरिकांसाठी घरे बांधली जाणार आहेत.
जगातील सहा सुपर सिटी शहरात नवी मुंबईचे नाव आहे. त्यामुळे जागतिक दर्जाचे प्रकल्प उभारण्याचा सिडकोचा ध्यास असून गोल्फ कोर्स आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ हे त्यापैकी दोन प्रकल्प आहेत. भविष्यात उभ्या राहणाऱ्या विमानतळावरून सहा कोटींपेक्षा जास्त हवाई वाहतूक होणार आहे. त्यामुळे या शहरात विविध देशांचे दूतावास असावेत यादृष्टीने ऐरोली सेक्टर १० अ येथे सिडकोने २७ हेक्टर जमीन राखून ठेवली आहे. त्यासाठी तेथील पायाभूत सुविधांवर दहा कोटी रुपये खर्चदेखील करण्यात आलेले आहेत. सिडकोने राखीव ठेवलेल्या या जागेत दूतावासासाठी साडेचार हजार चौरस फुटांची कार्यालये, त्यांच्या वसाहती, आंतरराष्ट्रीय शाळा, क्लब हाऊस अशा अद्ययावत सुविधा प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. दूतावासांच्या सुरक्षेचा प्रश्न लक्षात घेता त्यांना त्रिस्तरीय सुरक्षा दिली जाणार होती. ऐरोली सेक्टर १० मधील हा भाग खाडीकिनारी असल्याने समुद्राचा टच देण्याचा यात प्रयत्न केला गेला होता. पण या प्रकल्पाची केवळ तीन दूतावासांनी चौकशी केली असून इतर देशांनी त्याकडे अक्षरश: पाठ फिरवली आहे. अलीकडे काही दूतावास मुंबईतील दक्षिण भाग सोडून बीकेसीत आलेले आहेत. त्यामुळे हे दूतावास आता मुंबई सोडण्यास राजी नाहीत. २७ हेक्टर मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण होण्या अगोदर तेथे एखादा दुसरा प्रकल्प हाती घेण्यात यावा, असे मत नियोजन विभागाने व्यक्त केले आहे. त्यामुळे या जागेवर सिडको गृहनिर्माण प्रकल्प सुरू करण्याचा विचार करीत असून तसा प्रस्ताव लवकरच होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत सादर केला जाणार आहे.