‘बांधा-वापरा व हस्तांतरित करा’ या तत्वानुसार जेएनपीटी बंदराचा मोठय़ा प्रमाणात विस्तार होणार आहे. त्यामुळे या बंदरातील कंटेनर हाताळणीत आठ लाखांची वाढ होणार असून स्थानिकांसाठी मोठय़ा प्रमाणात रोजगार तसेच उद्योगही उपलब्ध होणार आहे. जेएनपीटी बंदराच्या विस्तारामुळे आगामी काळात नवी मुंबईसह रायगड आणि आजुबाजूच्या भागात विकासाचे नवे पर्व सुरू होणार आहे.
जेएनपीटी बंदरातील डी.पी. वर्ल्ड या खासगी बंदराचाच भाग असलेल्या न्हावा-शेवा (इंडिया) गेटवे टर्मिनल प्रायव्हेट लिमिटेडशी केंद्रीय बंदर खात्याने करार करून सतरा वर्षांकरिता ‘बांधा-वापरा व हस्तांतरित करा’ या तत्त्वावरील ३३० जेटी(नवीन धक्का) निर्माण करण्याची परवानगी दिली आहे. सध्या जेएनपीटी बंदरातील जेएनपीटीचे स्वत:चे बंदर, डी.पी. वर्ल्डचे अस्तित्वात असलेले बंदर व जी.टी.आय. या तीन बंदरांतून पंचेचाळीस लाख कंटेनरची वार्षकि हातळणी केली जात आहे. तर नव्या जेट्टय़ांमुळे जेएनपीटी बंदराच्या कंटेनर हाताळणीत आठ लाखांची वाढ होणार आहे.
१९९६ साली केंद्रीय नौकानयन मंत्रालयाने जेएनपीटी बंदरात ‘बांधा-वापरा व हस्तांतरित करा’ या बीओटी तत्त्वावर  न्हावा-शेवा इंटरनॅशनल कंटेनर टर्मिनल हे पहिले खासगी बंदर उभारण्याची परवानगी दिली. त्यामुळे रोजगारांच्या संधी उपलब्ध झाली. त्याचप्रमाणे व्यवसायातही वाढ होऊन जेएनपीटीला खासगी बंदराकडून रॉयल्टीच्या स्वरूपातही कोटय़वधी रुपये मिळत आहेत. पुढे २००५ साली जेएनपीटी बंदरात एपीएमटी म्हणजे जी.टी.आय. या दुसऱ्या खासगी बंदराला परवानगी देण्यात आली. त्यामुळे उरण-पनवेल परिसरात खासगी कंटेनर यार्डचा व्यवसायाही वाढला आहे. सध्या जेएनपीटीसह दोन खासगी बंदरांवर आधारित उरण-पनवेल परिसरातील गोदामे व कंटेनर यार्डची संख्या ६०च्या वर पोहोचली आहे. येथील प्रत्येक गोदामात किमान एक हजार याप्रमाणे साठ ते सत्तर हजार कामगार काम करीत आहेत.
जेएनपीटीचे महत्व लक्षात घेऊन  उरण ते पुणे असा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार तसेच उरण(जेएनपीटी) ते नवी मुंबई (आम्रमार्ग) या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात आले आहे. भविष्यात राष्ट्रीय व राज्य महामार्गाचे आठपदरीकरण, याच बंदराला जोडणारा न्हावा-शेवा-शिवडी ट्रान्सहार्बर मार्ग, यामुळे उरणला भागाला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे. जेएनपीटी बंदरामुळे उद्योगांना मिळालेल्या चालनेमुळे आता उरण, पेण व अलिबागमध्ये खासगी बंदरेही प्रस्तावित आहेत. जेएनपीटीने २०१४-१५ पर्यंत जेएनपीटीमधील सध्याच्या तीन बंदरांप्रमाणेच ४५ लाखांपेक्षा अधिक कंटेनर हाताळण्याची क्षमता असेल असे चौथे बंदर उभारण्याचे काम सिंगापूर सरकारच्या सिंगापूर बंदराला दिले आहे. या बंदरातही पाच हजारांपेक्षा अधिक रोजगार व बंदरावर आधारातील उद्योगातही रोजगारांची निर्मिती होणार आहे. त्यामुळे भविष्यात उरण-पनवेलचा परिसर  विकासाच्या मार्गावर जाणार असून वाढत्या नागरीकरणामुळे भविष्यात उरण हे मुंबईचे नवे औद्योगिक व उपनगर म्हणून उदयास येऊ घातले आहे.