कल्याण-बदलापूर रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारे अंबरनाथ येथील अनधिकृत गाळे हटवून हा रस्ता शंभर फुटी करण्यात येणार आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून काटई नाका (डोंबिवली) ते कर्जत आणि कल्याण-बदलापूर या दोन रस्त्यांचे काम सुरू आहे. काटई ते बदलापूर या रस्त्याचे काम आता पूर्ण होत आले आहे, मात्र कल्याण-बदलापूर रस्त्याचे रुंदीकरण अंबरनाथ शहरातील अनधिकृत गाळेधारकांच्या विरोधामुळे बराच काळ रखडले आहे.
गेल्या तीन दशकांहून अधिक काळ शासकीय जागेवर अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांचे आधी पुनर्वसन व्हावे यासाठी तत्कालीन पालकमंत्री गणेश नाईक यांनी या रस्त्याच्या कामास स्थगिती दिली होती. त्यामुळे हे काम रखडले आहे, मात्र अशा प्रकारे अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यांसाठी रस्ता रुंदीकरणास खो घालता येणार नाही. त्यांना पर्यायी जागा देऊन हा रस्ता शंभर फूट रुंद केला जाईल, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी ‘एमएमआरडीए’ अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.
कल्याण-बदलापूर रस्त्याच्या दुतर्फा अंबरनाथ तहसील कार्यालय ते फॉरेस्ट नाका दरम्यान सुमारे १५०० अनधिकृत टपऱ्या होत्या, मात्र रस्ता रुंदीकरणादरम्यान त्यांच्यावर कारवाई करण्यात कुचराई करण्यात आल्याने आता त्यांची संख्या वाढली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन या अनधिकृत बांधकामांचा बंदोबस्त करण्याचा मनोदयही आमदार कथोरे यांनी व्यक्त केला.
नव्याने बांधण्यात येत असलेल्या काटई-बदलापूर मार्गात येणाऱ्या प्रत्येक चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी आराखडे तयार करण्याच्या सूचनाही बैठकीत देण्यात आल्या.  
प्राधिकरणाचे एस.व्ही. अल्गूर, सिद्धेश्वरी टेंभूर्णीकर आदी याप्रसंगी उपस्थित होते.