पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमामुळे देशभरामध्ये स्वच्छतेविषयी व्यापक जागृती निर्माण झाली. राजकीय नेत्यांपासून ते अभिनेत्यांपर्यंत आणि सामाजिक संस्थांनीही स्वच्छतेसाठी रस्त्यावर उतरून स्वच्छता उपक्रमात सहभाग नोंदवला. महापालिका स्तरावरही या उपक्रमात सहभागी होण्यासाठी विविध प्रकारे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचा एक भाग म्हणून कल्याण-डोंबिवली महापालिकेने स्वच्छतेचा मोबाइल अॅप उपलब्ध करून दिला आहे. या अॅपवर अस्वच्छ ठिकाणांचे फोटो पाठवा आणि त्यानंतर काही तासांमध्ये त्यावर कारवाई केली जाईल असे आश्वासन महापालिकेने दिले आहे. प्रत्यक्षात मात्र कचरा उचलण्यासाठी होत असलेल्या दिरंगाईमुळे शहरातील कचराकुंडय़ा या अॅपच्या जन्मानंतरही अक्षरश: भरून वाहत असून कल्याण-डोंबिवलीकरांना किती फोटो काढू आणि किती नको, असे झाले आहे.
कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली कचराकुंडी त्यातून बाहेर लोंबकाळणारा कचरा, दरुगधी आणि घाणीचे साम्राज्य अशी अवस्था कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील कचराकुंडय़ांची असून हे चित्र मागील अनेक वर्षांपासून कायम आहे. या भागातील कचरा समस्या गंभीर असून त्यावर कायमस्वरूपी इलाज करण्याची मागणी अनेक वर्षांपासून शहरातील रहिवाशी करत आहेत. रेल्वे स्थानकात जाण्याच्या मार्गावर दोन कचराकुंडय़ा असून एक कचराकुंडी कल्याण पोस्ट ऑफिसच्या समोरच्या दिशेला आहे, तर दुसरी कचराकुंडी एसटी बस स्थानकाच्या बाजूला आहे. स्कायवॉकवर चढण्याच्या जागेवरच या कचराकुंडय़ा असल्याने नागरिकांना कचऱ्याच्या ढिगातून रोज वाट शोधावी लागते. येथे महापालिकेकडून दिवसातून एकदा कचरा उचलण्याचे काम केले जाते. हॉटेल व्यावसायिक, भाजीवाले, दुकानदार आणि फेरीवाल्यांकडून या कचराकुंडय़ांमध्ये मोठय़ा प्रमाणात घाण टाकली जात असून प्रत्येक तासाभरामध्ये या कचराकुंडय़ा भरून जातात. यावर कायमस्वरूपी कचरा उचलण्याची यंत्रणा कार्यरत करण्याची गरज निर्माण झाली आहे. महापालिकेकडून मात्र अशी कोणतीच प्रभावी यंत्रणा राबवली जात नाही. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.
अॅपवरून कचरा उचलण्यासाठी २४ तास..
कल्याण-डोंबिवली महापालिका कचऱ्याच्या प्रश्नावरून टीकेचे लक्ष्य होत असताना शहरातील अस्वच्छता दूर करण्यासाठी मोबाइल अॅपची मदत घेण्याचा निर्णय महापालिकेने घेतला असून अस्वच्छतेचा फोटो पाठवा काही वेळातच स्वच्छता होईल, असे आश्वासन महापालिकेने दिले आहे. मात्र फोटो पाठवल्यानंतर ही कारवाई होण्यासाठी २४ तासांहून अधिक काळ लागत असल्याने याचा नेमका उपयोग कुणाला असा प्रश्न नागरिकांच्या वतीने केला जाऊ लागला आहे. शिवाय अनेक वेळा या अॅपवरून पाठवण्यात येणाऱ्या फोटोंमध्ये बाहेरील शहरांमधील अनेक फोटो असल्याचे येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
डंपिंग नसलेल्याने कचरा प्रश्न गंभीर
डंपिंग नसलेल्या कल्याणचा कचरा प्रश्न गंभीर असून शहरामध्ये सुमारे ५५० मेट्रिक टन कचरा दररोज निर्माण होत असून सध्या हा कचरा क्षमता संपलेल्या आधारवाडी डंपिंग भूमीवर टाकला जात आहे.
त्यामुळे येथील नागरिकांच्याही आरोग्याचा प्रश्न कायम असून महापालिकेची पुरती कचराकोंडी झाली आहे. अशा परिस्थितीमध्येही स्वच्छतेच्या अॅपच्या माध्यमातून महापालिका शहरवासीयांना स्वच्छतेची स्वप्ने दाखवत आहे.
श्रीकांत सावंत, कल्याण
संग्रहित लेख, दिनांक 8th Jan 2015 रोजी प्रकाशित
कल्याणच्या कचऱ्याचे करायचे काय?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियान उपक्रमामुळे देशभरामध्ये स्वच्छतेविषयी व्यापक जागृती निर्माण झाली.
First published on: 08-01-2015 at 01:14 IST
मराठीतील सर्व ठाणे वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kalyan suffer with huge garbage problems