कामोठे वसाहतीमध्ये धावणाऱ्या एनएमएमटीच्या बसमधून चार दिवसांत १९ हजार प्रवाशांना प्रवास करण्याची संधी मिळाल्याने कामोठेकरांना एनएमएमटी पावली असे बोलण्याची वेळ आली आहे. यामुळे तब्बल एक लाख ३४ हजारांची तिकीट विक्रीचा गल्ला एनएमएमटीमध्ये जमल्याने ही बससेवा प्रवाशांच्या फायद्याची असल्याचे सिद्ध झाले. रिक्षा भाडय़ापेक्षा स्वस्त व सुरक्षित एनएमएमटीचा प्रवास असल्याने प्रवाशांचा ओघ एनएमएमटीकडे वाढतच आहे.  
गेल्या अनेक वर्षांपासून गैरसोयीत जगणाऱ्या कामोठेवासीयांना ५७ क्रमांकाच्या बस सुरू होण्यामुळे स्वस्त प्रवासाचा आधार मिळाला आहे. खांदेश्वर व मानसरोवर रेल्वेस्थानकातून कामोठे वसाहतीपर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची या बसने पायपीट थांबविली आहे. ही बससेवा सुरू झाल्यामुळे रेल्वेस्थानक ते वसाहत या पल्ल्यावर पायी चालून घर गाठणाऱ्या चाकरमान्यांना स्वस्त एनएमएमटीने प्रवास करता येत आहे. गुरुवारी ही बससेवा दुपारनंतर सुरू झाल्याने त्या दिवशी ९८१ प्रवाशांना त्यामधून प्रवास करता आले. मात्र शुक्रवारी पाच हजार ३७, शनिवारी सात हजार २८५ तर रविवारी मेगाब्लॉक असल्याने ५ हजार आठशे ५७ प्रवासींनी यामधून प्रवास केला. तसेच शुक्रवारी ३५ हजार २६४ , शनिवारी विक्रमी ५१ हजार रुपयांची तर रविवारी ४१ हजार रुपयांची तिकीट विक्री झाली. सोमवारी आठवडय़ाचा पहिला दिवस असल्याने ७५ हजार रुपये तिकीट विक्री व तब्बल साडेदहा हजार प्रवाशांना या बससेवेचा फायदा होण्याची शक्यता एनएमएमटी प्रशासनाने व्यक्त केली आहे.
कामोठे प्रवासींकडून एनएमएमटी प्रशासनाकडे मासिक पास योजनेची चौकशी होत आहे. १८ दिवसांच्या तिकीट भाडेदरात म्हणजेच ३२४ रुपयांत ३० दिवसांत प्रवास करणे प्रवाशांना पास काढल्यास शक्य होणार आहे. तसेच त्रमासिक पास योजनेसाठी ५० दिवसांच्या तिकीटभाडे दरात ९० दिवस प्रवास करता येणे शक्य होणार आहे. पास उपलब्ध करण्यासाठी मानसरोवर व खांदेश्वर स्थानकांबाहेर एनएमएमटी प्रशासनाने सोय करण्याची मागणी प्रवासी श्रीकांत तावडे यांनी केली आहे.  
खांदेश्वर प्रवासाचे वेध
खांदेश्वर ते वाया खांदा कॉलनी ते नवीन पनवेल आदई बससेवा सुरू करावी अशी मागणी खांदेश्वर स्थानकातून रोज प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी मनाली कापसे यांनी केली आहे. खांदा कॉलनीमध्ये फिरणारी २४ नंबरची बससेवा बंद आहे. तसेच खांदेश्वर वसाहत ते रेल्वेस्थानक जोडणारी एकही बससेवा उपलबद्ध नाही त्यामुळे कामोठे वसाहतीनंतर एनएमएमटी प्रशासनाने खांदा कॉलनीतील प्रवाशांचा विचार प्राधान्याने करावा अशी मागणी प्रवासी वर्गाकडून होत आहे.
सध्या एनएमएमटीच्या चार बससेवा कामोठे येथे सुरू आहेत. मानसरोवर ते खांदेश्वर स्थानक अशी बसेस धावतात. मात्र प्रवाशांना जैन पार्क ते मानसरोवर स्थानक यामर्गावर सकाळी व सायंकाळी पाचवी बस असावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. रेल्वेच्या वेळेनुसार बस असल्यास सुमारे वीस हजार प्रवाशांना ही बससेवा फायद्याची ठरेल. असा आशावाद प्रवासी मंजुळा खेडेकर यांनी व्यक्त केला आहे.