News Flash

चंद्रपूर जिल्ह्य़ात वाघ व बिबटय़ाचा धुमाकूळ ; १५ दिवसांत ५ बळी

जिल्हय़ात वाघ व बिबटय़ाने धुमाकूळ घातला असून, वनविकास महामंडळाच्या पाथरी वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राखीव जंगलात आज सकाळी पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यात ललिता आनंदराव पेंदाम (५०) ही

| April 12, 2013 04:24 am

जिल्हय़ात वाघ व बिबटय़ाने धुमाकूळ घातला असून, वनविकास महामंडळाच्या पाथरी वनक्षेत्रांतर्गत येणाऱ्या राखीव जंगलात आज सकाळी पट्टेदार वाघाने केलेल्या हल्ल्यात ललिता आनंदराव पेंदाम (५०) ही महिला ठार झाली. गेल्या पंधरा दिवसांत वाघ व बिबटय़ाने घेतलेला हा पाचवा बळी आहे. दरम्यान, ताडोबा प्रकल्पात दोघांचा बळी घेणाऱ्या बिबटय़ाला आज पहाटे जेरबंद करून रेस्कू सेंटरमध्ये निरीक्षणात ठेवण्यात आले आहे.
 सावली तालुक्यांतर्गत येणाऱ्या पाथरी गावची ललिता पेंदाम ही गुरुवारी पहाटे ५.५० वाजता मोहफुले वेचण्यासाठी वन विकास महामंडळाच्या राखीव जंगलातील कक्ष क्रमांक १६२ मध्ये गेली होती. इतर महिलांसह ललिता मोहफुले वेचत असतानाच झुडपात बसलेल्या वाघाने अचानक तिच्यावर हल्ला चढविला. काही लक्षात येण्यापूर्वीच वाघाने ललिताच्या नरडीचा घोट घेतला. वाघाला बघून सहकारी महिला घाबरून घटनास्थळाहून पळून गेल्या. महिलांनी या घटनेची माहिती देताच गावकऱ्यांनी जंगलाच्या दिशेने धाव घेतली. मात्र तोपर्यंत वाघ घटनास्थळाहून जंगलात पसार झाला होता. या घटनेची माहिती मिळताच वनविकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक संजय ठाकरे, क्षेत्र सहायक तुराणकर, ठाणेदार घुगल घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळय़ात महिला मृतावस्थेत पडून होती. ‘एफडीसीएम’च्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मृताच्या कुटुंबीयांना तत्काळ दहा हजारांची मदत देऊन पंचनामा केला. यानंतर मृतदेह मूल येथे ग्रामीण रुग्णालयात विच्छेदनासाठी आणण्यात आला. गेल्या पंधरवडय़ात वाघ व बिबटय़ाने घेतलेला हा पाचवा बळी आहे. पंधरा दिवसांपूर्वी उपरसार येथे व ६ एप्रिलला सादागड येथे वाघाने महिलेला ठार केले होते. त्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पात  बुधवारी बिबटय़ाने एक दोघांचा बळी घेतला. या घटनांवरून वन अधिकाऱ्यांना गावकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. या घटनेला चोवीस तासाचा अवधी होत नाही तोच आज पुन्हा एका महिलेला वाघाने ठार केल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ही घटना बघता जंगलात पिंजरा लावून वाघाला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांनी लावून धरली आहे. दुसरीकडे ताडोबा व्याघ्र प्रकल्पात दोघांचा बळी घेणाऱ्या बिबटय़ाला जेरबंद करण्यात वन खात्याला यश आले. बिबटय़ाने बुधवारी तुकाराम धारणे व मालन मुनघाटे या दोघांचा बळी घेतला होता. ताडोबा बफर झोनमधील ही घटना बघता उपवनसंरक्षक कल्याणकुमार यांनी या ठिकाणी तीन पिंजरे लावले होते. घटनास्थळापासून अगदी जवळ असलेल्या आगरझरी येथील पिंजऱ्यात हा बिबटय़ा अलगद अडकला. आज पहाटे गावकरी व वन कर्मचाऱ्यांना बिबटय़ा पिंजऱ्यात जेरबंद झाल्याचे दिसताच त्यांनी या घटनेची माहिती मोहुर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी राऊतकर यांना दिली. यानंतर उपवनसंरक्षक कल्याणकुमार, उपवनसंरक्षक गिरीष वशिष्ठ सहायक उपवनसंरक्षक अरुण तिखे व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बिबटय़ाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी म्हणून डॉ. कडूकर यांना पाचारण करण्यात आले. गुरुवारी सकाळी डॉ. कडूकर यांनी बिबटय़ाची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला मोहुर्लीच्या रेस्कू सेंटरमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. किमान आठवडाभर या बिबटय़ाला रेस्कू सेंटरमध्ये ठेवण्यात येणार असून त्यानंतरच जंगलात सोडण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2013 4:24 am

Web Title: kerfuffle of tiger and panther in chandrapur district 5 killed in 15 days
टॅग : Panther,Tiger
Next Stories
1 बुलढाणा जिल्ह्य़ातील ५६ प्रकल्प कोरडे
2 पदवीदान समारंभाला याकूब मेमन मुकणार
3 पीडब्ल्यूडी भ्रष्टाचाराच्या याचिकेवर राज्य सरकारला दाखलपूर्व नोटीस
Just Now!
X