सायन-पनवेल महामार्गावर खारघर टोलनाका नोव्हेंबर महिन्यात सुरू होत असल्याच्या मोबाइल फोनवरील संदेशाने निवडणुकीनंतर नि:श्वास सोडलेल्या पनवेलच्या राजकारण्यांची झोप उडवली आहे. त्यामुळे निवडणुकीनंतरही खारघर टोलचा मुद्दा पुन्हा पेटणार हे निश्चित झाले आहे. वाशी टोलपासून १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या टोलमधून पनवेलमधील संपूर्ण वाहनांना सूट मिळणार का, हाच कळीच मुद्दा आहे. गेल्या तीन दिवसांपासून १ नोव्हेंबरपासून खारघरचा टोलनाका सुरू होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा १५ नोव्हेंबरला आपली आमदारकी ठाकूर पुन्हा एकदा पणाला लावतील का, असा संदेश मोबाइलवर सोशल मीडियांद्वारे फिरत आहे. याबाबत सायन-पनवेल टोलवेज कंपनीकडे विचारणा केली असता १ नोव्हेंबरला टोलनाका सुरू करण्याचे कोणताही बेत नसल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. शेतकरी कामगार पक्षाने मात्र या टोलबाबत ठाकूरांना लक्ष्य करून त्यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मोबाइलवरील संदेश कोण पसरवत आहेत याचा शोध अद्याप लागलेला नाही. आमदार ठाकूर यांची बदनामी करणाऱ्यांविरोधात तशी भाजपच्या वतीने कोणतीही तक्रार पोलीस ठाण्यात दाखल नाही. मात्र या सर्व अफवांच्या बाजारात गुरुवारी सकाळी खारघर टोलनाक्यावरील वाढलेल्या पोलीस बंदोबस्तामुळे पनवेलच्या वाहनचालकांच्या छातीत टोलची धडकी भरली.
निवडणुकीपूर्वी आमदार ठाकूर व त्यांचे पिता माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी खारघर टोलनाक्यातून एमएच-४६ या वाहनांना सवलत मिळावी ही मागणी केली होती. या मागणीमुळे पनवेलसह उरण, खालपूर, कर्जत या तालुक्यांतील वाहनांना सवलत मिळणार होती. आमदार ठाकूर हे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना वेळोवेळी या टोलनाक्यातून ‘एमएच-४६’ वाहनांना सवलत मिळावी यासाठी भेटत होते. मात्र अनेक भेटींनंतर हा प्रश्न सुटत नव्हता.

टोल एवढय़ात सुरू होण्याचा प्रश्न येत नाही. सागरी नियंत्रण रेषेच्या उल्लंघनप्रकरणी ग्रीन ट्रिबीनलचे प्रकरण न्यायालयात सुरू आहे. तसेच टोलनाका सुरू होण्याअगोदर सरकारचा वटहुकूम निघतो. १ नोव्हेंबर रोजी खारघरचा टोलनाका सुरू होत असल्याचे मोबाइलवर फिरणारे संदेश ही अफवा आहे. तसेच या मुद्दय़ावरुन १५ नोव्हेंबरला माझ्या आमदारकीचा राजीनामा ही अफवा पसरवली जात आहे. स्थानिक वाहनांना सवलत मिळावी यासाठी मी अनेक महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न करीत आहे.
    आमदार प्रशांत ठाकूर

आमदार ठाकूर यांना खुद्द मुख्यमंत्र्यांनी एकदा पनवेल-४६ मध्ये अशी किती वाहने आहेत, असा प्रश्न विचारला. त्या वेळी मला ठाऊक नाही, असे उत्तर ठाकूर यांनी चव्हाण यांना दिले होते. आमदार ठाकूर यांच्या मते ही आकडेवारी चव्हाण यांच्याकडेही उपलब्ध नव्हती. परंतु हीच आकडेवारी लोकसत्ताच्या हाती लागली आहे. परिवहन विभागाने २०१३ मार्च महिन्यापर्यंत नोंदविलेल्या आकडेवारीनुसार पनवेल तालुक्यातील ३९ हजार १५७, उरणच्या २६ हजार ५४३, खालापूरच्या १८ हजार ५१२, तसेच कर्जतच्या १२ हजार ४२८ वाहनचालकांना या टोलनाक्याचा फटका बसणार आहे.  nmv01