जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत सुख मिळवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते, मात्र सर्व काही जवळ असूनही तो सुखी होतो का, हा खरा प्रश्न आहे. शाश्वत सुखासाठी स्वत:मधील ऊर्जा जागृत करा, हेच वेदान्ताचा अभ्यास केल्यानंतर लक्षात येते. वेदान्तामध्ये आनंदी, सुखमय जीवन जगण्याचा राजमार्ग सांगितला आहे, असे प्रतिपादन विश्व फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांनी केले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विवेकानंद संस्कार संस्थेच्या स्वामी विवेकानंद जयंती १५० वष्रे समारोह समितीच्या वतीने ‘स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला’अंतर्गत डॉ. राजीमवाले यांनी ‘वेदान्त आनंदाचा राजमार्ग’ या विषयावर आठवे पुष्प गुंफले. अध्यक्षस्थानी रमेशअप्पा कराड होते. समितीचे अध्यक्ष डॉ. एस. बी. सलगर, व्याख्यानमाला समितीचे संयोजक यशवंत जोशी, विवेकानंद संस्कार संस्थेचे कार्याध्यक्ष अॅड. संजय पांडे, छात्रशक्ती निर्माण केंद्राचे अध्यक्ष डॉ. राजेश पाटील यांची उपस्थिती होती.
राजीमवाले म्हणाले, वेदान्त म्हटले, की खूप अवघड, कठीण विषय अशी अनेकांची धारणा आहे. स्वामी विवेकानंदांनी भारतीय तत्त्वज्ञान जगापुढे ठेवत वेदान्ताचा विषय सोप्या पद्धतीने जगाला सांगितला. वेदान्ताचा अभ्यास केल्यास वेदान्त म्हणजे काय?, देव म्हणजे काय?, अध्यात्म म्हणजे काय? याचा उलगडा होतो. प्रत्येक व्यक्तीत ईश्वरी तत्त्व असते. प्रत्येकाचा ईश्वरत्व प्राप्त होण्यासाठी जन्म असतो, मात्र त्याने देव बनायचे की दानव हे ठरवावे. आपल्या देहात देव आहे. परंतु जोपर्यंत आपण त्याला ओळखत नाही तोपर्यंत तो निस्तेज जीवन जगत असतो, असे ते म्हणाले. अध्यक्षीय समारोप कराड यांनी केला. प्रास्ताविक अॅड. संजय पांडे यांनी केले. सूत्रसंचालन प्रदीप नणंदकर यांनी केले.