सिडकोने शहर वसविताना धार्मिक व आध्यात्मिक उद्देशासाठी लागणारे भूखंड लक्षात घेऊन प्रत्येक उपनगरात धर्मीयांच्या लोकसंख्येनुसार भूखंड दिलेले असताना नवी मुंबईत अनधिकृतरीत्या उभ्या राहिलेल्या प्रार्थनास्थळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. सिडकोने नवी मुंबई, पनवेल, उरण भागात आतापर्यंत १३० भूखंड विविध प्रार्थनास्थळांसाठी दिलेले आहेत असे असताना शहरात ५५० पेक्षा जास्त अनधिकृत प्रार्थनास्थळे उभी राहिली आहेत. थोडक्यात शाळा कमी आणि प्रार्थनास्थळे जास्त असे चित्र असून सिडकोने आपल्या हद्दीतील अनधिकृत स्थळांना नुकत्याच्या नोटिसा जारी केल्या आहेत.
सानपाडा येथील मस्जिदीच्या भूखंडावरून काही महिन्यांपूर्वी बराच गदारोळ झाला. या ठिकाणी ऐन वसाहतीत मस्जिदीला भूखंड अदा केल्याने आजूबाजूच्या रहिवाशांनी मोर्चा, निर्देशने अशी आंदोलने केली. मुस्लीम बांधवांची या ठिकाणी जादा लोकसंख्या नसताना हा भूखंड देण्यात आल्याबद्दल काही संघटनांनी हा उठाव केला होता. त्यामुळे हा भूखंड बदलून इतरत्र देण्याची तयारी सिडकोने दर्शवली आहे. धार्मीक व आध्यात्मिक उद्देशासाठी भूखंड देण्यासाठी सिडकोने १९७५ मध्ये एक धोरण निश्चित केले आहे. या धोरणात दर पाच ते दहा वर्षांनी काही सुधारणा करण्यात येते. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या धोरणात काही बदल करण्यात आले असून शहरातील धार्मिक संस्थांसाठी प्राधान्यक्रम ठरविण्यात आला आहे. त्यानंतर राष्ट्रीय व राज्य स्तरावरील धार्मिक संस्थांचा विचार करण्यात आला असून लवकरच ४५ भूखंड वितरित केले जाणार आहेत. आतापर्यंत सिडकोने पालिका क्षेत्रात ९८ तर सिडको क्षेत्रात १३० भूखंड अदा केलेले आहेत. यात सर्व धर्माचा समावेश आहे. सिडकोने अधिकृत भूखंड दिलेले असताना नवी मुंबई, पनवेल, उरण भागात ५५० पेक्षा जास्त अनधिकृत प्रार्थनास्थळे उभी राहिले आहेत. यात काही राजकीय पक्षांनी प्रार्थनास्थळे हे राजकीय अड्डे तयार केले आहेत. सिडकोने शहराची काळजी घेताना प्रत्येक धर्माच्या लोकसंख्येनुसार धार्मिक उद्देशासाठी भूखंड आरक्षित ठेवलेले आहेत. असे भूखंड दिलेले असताना अनधिकृत प्रार्थनास्थळे उभी राहात असल्याने त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे असा एक मतप्रवाह आहे. अधिकृत प्रार्थनास्थळ उभारताना सिडकोच्या अनेक अटी व नियम पूर्ण करावे लागत असून पोलिसांची व शासनाची विशेष परवानगी घ्यावी लागत आहे पण याचवेळी अनधिकृत प्रार्थनास्थळे बांधताना कोणतीही परवानगी किंवा नियम पाळावे लागत नसल्याने ती एका दिवसात उभी राहत आहेत. त्यामुळे शहरात अनधिकृत प्रार्थनास्थळांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र आहे.