राजस्थान व लडाखनंतर कमी पावसाचा प्रदेश म्हणून ख्याती असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात यंदा सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचे संकट उभे राहिले असताना त्यावर शासन स्तरावर तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत. परंतु दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजना राबविणे ही काळाची गरज बनली आहे. सोलापूरपासून अवघ्या २२ किलोमीटर परिसरात तीव्र टंचाई असलेल्या भागात लोकमंगल साखर कारखान्याने शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर लोकसहभागातून लोकमंगल बंधारे बांधण्याचा संकल्प हाती घेतला आहे. शिरपूर बंधाऱ्यापेक्षा काही प्रमाणात उजवा ठरेल अशा पध्दतीची ओळख या लोकमंगल बंधाऱ्याची निर्माण होईल,असा विश्वास आहे.
दुष्काळी सोलापूर जिल्ह्य़ात शासन स्तरावर शिरपूर पॅटर्न बंधाऱ्याचा मोठा गवगवा होत आहे. प्रत्येक तालुक्यात एक याप्रमाणे शिरपूर पॅटर्न बंधारा बांधण्यात येणार आहे. परंतु गेल्या दोन वर्षांपासून त्याची केवळ चर्चाच ऐकायला मिळत आहे. शासन स्तरावर हे काम केव्हा होईल, याची शाश्वती देता येणार नाही. परंतु उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ परिसरात लोकमंगल साखर कारखान्याने स्वत: पुढाकार घेऊन शिरपूर पॅटर्नप्रमाणे बंधारा बांधण्याचे काम हाती घेतले आहे. सुमारे दहा कोटी खर्चाचा हा बंधारा प्रत्यक्षात शिरपूर पॅटर्नपेक्षा अधिक सरस ठरण्याची शक्यता आहे.
बीबी दारफळ, नान्नज परिसरात असलेल्या ओढय़ाचे सरळीकरण करून त्यातून लोकमंगल बंधारा बांधण्यात येत आहे. हे काम सध्या गतीने सुरू असून येत्या जूनअखेपर्यंत हा बंधारा पूर्ण होऊन त्यात पावसाचे पाणी अडविले जाणार आहे. या बंधाऱ्यामुळे तब्बल ७५० कोटी लिटर पाणी साठविले जाणार आहे. पर्यायाने त्याचा लाभ आसपासच्या सुमारे एक हजार हेक्टर क्षेत्राच्या सिंचनासाठी होऊन स्थानिक शेतकऱ्यांचे भाग्य उजळण्यास मदत होणार आहे.
या संदर्भात लोकमंगल साखर कारखान्याचे संस्थापक-अध्यक्ष तथा भाजपचे माजी खासदार सुभाष देशमुख यांनी या लोकमंगल बंधाऱ्यांच्या उभारण्यामागची पाश्र्वभूमी विशद केली. तीन वर्षांपूर्वी शिरपूर येथे आपण प्रत्यक्ष भेट देऊन तेथील बंधाऱ्यांची पाहणी केली होती. त्यापासून प्रेरणा घेत तशा प्रकारे बंधारे आपणही उत्तर सोलापूर तालुका परिसरात निर्माण करण्याचा संकल्प सोडला. त्यासाठी लोकसहभाग अपेक्षित होता. परंतु सुरुवातीला परिसरातील शेतकऱ्यांनी नकारात्मक मानसिकता दाखविली. तेव्हा या शेतकऱ्यांची सहल घेऊन शिरपूरला गेलो. तेथील बंधाऱ्यांमध्ये अडविण्यात आलेले पाणी व त्यामुळे फुललेली शेती पाहून हे शेतकरी प्रभावित झाले. त्यामुळे बीबी दारफळ परिसरात शिरपूर पॅटर्नप्रमाणे लोकमंगल बंधारा उभारण्यास गती आली. गेल्या २६ जानेवारी रोजी प्रत्यक्षात बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली.
प्रारंभी बीबी दारफळ परिसरातील ओढय़ाचे सरळीकरण करून बंधाऱ्याचे काम हाती घेतले तेव्हा बऱ्याच समस्या होत्या. ओढय़ालगत प्रचंड प्रमाणात चिलारीची झाडी होती. त्यामुळे तेथे पाऊल ठेवणे कठीण होते. ही झाडी काढून ओढय़ाचा परिसर मोकळा केला. काही मंडळींनी केलेली अतिक्रमणे दूर झाली. तेथून लोकसहभाग वाढल्याने बंधाऱ्याच्या निर्मितीला गती व दिशा मिळाली.
नान्नज येथे पाझर तलावालगतच्या सुरू होणाऱ्या ओढय़ापासून बंधाऱ्याच्या कामाला सुरुवात झाली. तेथून बीबी दारफळपर्यंत आठ किलोमीटर अंतरापर्यंत बंधाऱ्याचे काम झपाटय़ाने होत आहे. यात तीन कोल्हापुरी पध्दतीचे तीन बंधारे व एक सिमेंट बंधारा आहे. आणखी चार सिमेट बंधारे बांधण्यात येत आहेत. पुढे बीबी दारफळ ते सावळेश्वपर्यंत सात किलोमीटर अंतरापर्यंत आणखी चार बंधारे समाविष्ट आहेत.
बंधाऱ्यासाठी दोन मीटर खोली व २५ मीटर रुंद याप्रमाणे ओढय़ाचे सरळीकरण झाले. या बंधाऱ्याच्या कामावर जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता व्ही. एन. होनमुटे हे देखरेख ठेवत असून त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा बंधारा प्रत्यक्षात शिरपूर पॅटर्नपेक्षा उजवा ठरणार आहे. प्रत्येक बंधाऱ्यामध्ये २५० कोटी लिटर पाणी साठणार आहे. याप्रमाणे एकूण ७५० कोटी लिटर पाणी अडविले जाणार आहे. एका बंधाऱ्याद्वारे १.४ किलोमीटर परिसरातील १८ मीटपर्यंत पाणी झिरपणार आहे. ओढय़ाची खोली व रुंदीकरण करताना एका बंधाऱ्यासाठी आतापर्यंत ५० हजार क्युबेक्स मीटर माती उचलण्यात आली असून त्याचा खर्च सुमारे पन्नास लाखांपर्यंत झाला आहे, तर प्रत्येक बंधाऱ्यासाठी २० लाखांचा खर्च अपेक्षित आहे. याप्रमाणे एकूण खर्च सुमारे दहा कोटींच्या घरात जातो. जमिनीखाली पाण्याचा निचरा होणार नाही, याची दक्षता घेण्यात आल्याची माहिती शाखा अभियंता होनमुटे यांनी दिली. या बंधाऱ्याच्या कामावर विशाल देशमुख यांचाही महत्त्वाचा सहभाग आहे.
सुभाष देशमुख यांनी प्रत्यक्षात लोकसहभागामुळेच आपण शिरपूर पॅटर्नप्रमाणे बीबी दारफळ परिसरात लोकमंगल बंधाऱ्याचे काम हाती घेऊ शकल्याचे नमूद केले. त्याचा लाभ बीबी दारफळसह रानमसले,नान्नज, अकोले काटी या चार गावांना होणार आहे. या चारही गावांना सध्या टँकरने पाणी पुरवठा होतो. परंतु या बंधाऱ्यामुळे ही चारही गावे टँकरमुक्त होतील. तसेच परिसरातील शेतीला पाणी मिळणार आहे. शासनाच्या मदतीवर अवलंबून न राहता लोकसहभागातून बंधारा बांधण्याचे हाती घेतलेले काम यशस्वी होत असल्याचे पाहून मनापासून समाधान वाटते. अशा प्रकारचे बंधारे जिल्ह्य़ात इतर मंडळींनीही हाती घ्यावेत. त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याची आपली तयारी असल्याचेही देशमुख यांनी सांगितले.