लग्नानंतर प्रेमप्रकरण सुरूच ठेवणे आणि रात्री उशिरा आल्याबद्दल जाब विचारल्यास त्याविरुद्ध पोलिसांत तक्रार करण्याची धमकी देणे ही मानसिक छळवणूकच आहे, असा निर्वाळा देत कुटुंब न्यायालयाने याच पाश्र्वभूमीवर पतीने केलेली काडीमोडाची मागणी मान्य केली. वर पत्नीला कुठलाही देखभाल खर्च देण्यासही स्पष्ट नकार दिला. पत्नीचे प्रेमप्रकरण अद्यापही सुरू असल्याचे कळल्यावर आणि वर सतत पोलिसांत जाण्याची धमकी देण्याला कंटाळून पतीने लग्नानंतर अवघ्या महिन्याभरानंतरच घटस्फोटासाठी कुटुंब न्यायालयात धाव घेतली. २००६ मध्ये या दाम्पत्याचा विवाह झाला होता आणि लग्नानंतर अवघा एक महिनाच ते दोघे एकत्र राहिले. पत्नीची वागणूक हा मानसिक क्रूरपणा असल्याचा दावा करीत पतीने घटस्फोट अर्जात केला होता. न्यायालयाने पतीचे म्हणणे मान्य करीत त्यांचा घटस्फोट मंजूर केला.
आरोप खोटे असतील तर आरोप करण्यात आलेली व्यक्ती त्याचा तीव्र विरोध करते. परंतु याप्रकरणी पत्नीतर्फे कोणताही बचाव करण्यात आला नाही. याचाच अर्थ पतीचे आरोप खरे असून पत्नीला ते मान्य असल्याचेच सिद्ध होते, असे निरीक्षण न्यायालयाने व्यक्त केले. पतीने आपला दावा सिद्ध करण्यासाठी सादर केलेल्या पुराव्यांतून लग्न झाल्यापासूनच पत्नीला तिच्या वैवाहिक जबाबदाऱ्या पार पाडण्यात रस नसल्याचे दिसून येते. तिने तिचे आधीचे प्रेमप्रकरण लग्नानंतरही सुरूच ठेवले होते. या सर्व बाबी म्हणजे पतीचा मानसिक छळच असल्याचेही न्यायालयाने म्हटले. या दोन मुख्य आरोपांबरोबर पत्नीने ३५ हजार रुपये चोरले आणि आईवडिलांकडे पळून गेल्याचा आरोपही पतीने केला होता. तिचे काही समाजकंटकांशीही संबंध होते. बाहेर जाताना ती कधीच सांगत नसे आणि त्याबाबत विचारल्यास पोलिसांत तक्रार करण्याची धमकी वारंवार देत असे, असे आरोपही पतीने केले होते. वैवाहिक जबाबदाऱ्या तर दूरच; पण ती आपल्याला व आपल्या आईवडिलांनाही शिवीगाळ करीत असे. गेल्या सात वर्षांपासून ती एकदाही आपल्या घरी आलेली नाही वा पुन्हा नांदण्यासही तिने नकार दिला, असे पतीने निदर्शनास आणून दिले.
घटस्फोटाच्या अर्जावर न्यायालयाने पत्नीला म्हणणे मांडण्यास सांगितले होते. परंतु एकाही नोटिशीला तिने प्रतिसाद दिला नाही. अखेर न्यायालयाने पतीची घटस्फोटाची मागणी मान्य केली.