कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालय व जवाहर को-ऑप. इंडस्ट्रीज सोसायटी यांच्यातील येथील रस्त्याच्या वादात कळंबोली व कामोठेकरांची वाट मात्र रोखली गेली आहे. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाकडे जाणारा हा रस्ता आमच्याच मालकीचा आहे, असा पवित्रा घेऊन जवाहर इंडस्ट्रीज व रुग्णालयाने या रस्त्यावरील वाहतूक सेवा अडथळे टाकून बंद केली आहे. २० वर्षांपासून या मार्गाचा वापर करणाऱ्या कळंबोली, कामोठेवासीयांनी हा रस्ता बंद केल्याने याबाबत संताप व्यक्त केला आहे. या रस्त्यावरून केवळ रुग्णालय आणि कारखान्यातील कामगारांनाच जाण्याची मुभा देण्यात आली आहे.
कामोठे येथील जवाहर को-ऑप. इंडस्ट्रीजमध्ये ११४ कारखाने आहेत. त्यापैकी २५ टक्के कारखाने बंद अवस्थेत आहेत. मुळात ही जागा या इंडस्ट्रीजला भाडेतत्त्वांच्या करारावर देण्यात आलेली आहे. पनवेल-शीव महमार्गावर अनेकदा वाहतूक कोंडी झाल्यास येथील वाहने वाहतूक विभाग याच मार्गाने काढत असतात.  परंतु एमजीएम रुग्णालय आणि जवाहर को.ऑप. इंडस्ट्रीजने या रस्त्यावर मालकी हक्काचा दावा करून हा रस्ता आपल्या कामगारांसाठी सुरू ठेवून येथील ग्रामस्थांसाठी बंद केला. दोघांनीही अडथळे टाकून रस्ता अडविला आहे. या मार्गाचा वापर कामोठे, कळंबोली येथील ग्रामस्थ व वाहनचालक एमजीएम रुग्णालयाकडे जाण्यासाठी या रस्त्याचा वापर करीत होते. ३ मार्चपासून औद्योगिक वसाहतीमध्ये आत शिरण्यासाठी र्निबध सुरू झाले आहेत. इंडस्ट्रीज समितीने ग्रामस्थांना व त्यांच्या वाहनांना रोखण्यासाठी रखवालदार उभे केले आहेत.  आतापर्यंत १०७३ अवजड वाहनांना पास देऊन सोडण्यात आले.
 याबाबत जवाहर इंडस्ट्रीजचे व्यवस्थापक आर. एस. निकम म्हणाले, की मी या पदावर नवीन आहे. सध्या या समितीचे अध्यक्ष प्रदीप गुप्ते हे परदेशी गेले आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय समितीने घेतला आहे. हा मार्ग समितीच्या मालकीचा आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे. काही दिवसांत याबाबत सर्व माहिती घेऊन कळवतो, असे सांगितले.
या विभागाचे नियंत्रक अधिकारी प्रदीप गिरीधर यांना विचारले असता त्यांनी याविषयी माहिती घेऊन कळवतो असे सांगितले. एमजीएम प्रशासनाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सलगोत्रा हे बैठकीत मग्न असल्याने त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. दरम्यान, वाहतूक विभागाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.