नागपूर शहर विकासाच्या दिशेने पावले टाकत असतानाच या शहराला ‘एज्युकेशन हब’ बनविण्याकरिता इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटची (आयआयएम) परवानगी द्यावी, अशी मागणी विदर्भ आर्थिक विकास परिषदेने (वेद) केली आहे. पुणे विद्यापीठ आणि सिम्बॉसिसमध्ये दोन संस्था आहेत. तसेच भारतातील काही राज्यातील छोटय़ा शहरात ‘आयआयएम’ असताना राज्याच्या उपराजधानीला त्यापासून का वंचित ठेवण्यात आले, असा प्रश्न ‘वेद’ने उपस्थित केला आहे.
केरळमधील कोझीकोड, हरयाणातील रोहतक, तामिळनाडूतील तिरुचिरपल्ली, राजस्थानमधील उदयपूर आणि उत्तराखंडमधील काशीपूर या छोटय़ा शहरांमध्ये आयआयएम असू शकते, तर नागपूर ही राज्याची उपराजधानी असल्याने या शहरातसुद्धा ‘आयआयएम’ असायलाच हवे, अशी आग्रही मागणी वेदने केली आहे. नागपूर विद्यापीठांतर्गत १९६९ मध्ये व्यवसाय व्यवस्थापन विभाग स्थापन करण्यात आला. मात्र, स्थापनेपासून ३० वर्षांहून अधिक कालावधी लोटला, पण पूर्णवेळ संचालक आणि शाखा सदस्यांची अनुपस्थिती यामुळे ही शाखा दुर्लक्षित राहिली आहे. केवळ तीन पूर्णवेळ सदस्य या ठिकाणी असले तरीही संसाधनांच्या दुरावस्थेमुळे शाखा असून नसल्यासारखी आहे.
नागपूरपासून ३५ किलोमीटर अंतरावरील नागपूर काटोल रोडवर इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट टेक्नॉलॉजी ही एकमेव राष्ट्रीय संस्था आहे. मार्केटिंग, मानव संसाधन आणि माहिती तंत्रज्ञान या विषयातून पदव्युत्तर पदवी विद्यार्थी घेतात. मानव संसाधनाचा पाया नागपुरात घडवला जातो. नागपुरातून उच्च दर्जाचे तांत्रिक शिक्षण घेतलेले विद्यार्थी पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि भारताच्या इतर भागात आहेत. विमान, रेल्वे आणि बस अशा तिन्ही सुविधा नागपुरात उपलब्ध आहेत. उत्तरप्रदेश, बिहार आणि छत्तीसगडचे विद्यार्थी पुण्यापेक्षा नागपूरला याच कारणाने प्राधान्य देतात. इंदोरचे आयआयएम, हैदराबादचे इंटरनॅशनल स्कूल ऑफ बिझनेस आणि रायपूरचे आयआयएम वगळता त्या ठिकाणी इतर कोणत्याही व्यवस्थापन संस्था नाहीत. मात्र, नागपुरात आयटी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. आयटी कंपन्या आहेत आणि उत्पादनसुद्धा आहे. या व्यतिरिक्त नागपुरात जागेची कमतरता नसून जागा सहज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे आयआयएम नागपुरात स्थापन करण्यास काहीच हरकत नाही. वेकोलि मॉईल, एमईसीएल, सीआयसीआर आणि नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस, नॅशनल अकॅडमी ऑफ डिफेन्स प्रॉडक्शन नागपुरात असल्याने त्याचा मोठा फायदा मिळू शकतो. त्यामुळे नागपुरात इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट स्थापन करण्यात यावे, अशी मागणी ‘वेद’ या संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे.