परतूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार सुरेश जेथलिया काँग्रेसच्या वाटेवर आहेत. काँग्रेसमध्ये आपण प्रवेश करणार हे सांगण्यासाठी त्यांनी मंगळवारी थेट काँग्रेसच्या जिल्हा मेळाव्याचे व्यासपीठ गाठले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या मेळाव्यात त्यांनी काँग्रेस प्रवेशाची इच्छा व्यक्त केली. परंतु त्यासाठीचा मुहूर्त मात्र नंतर धरणार असल्याचे सांगितले. जेथलिया काँग्रेसमध्ये प्रवेशासाठी परतूर येथे मेळावा घेणार असून मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ही घोषणा व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
मराठवाडय़ाच्या राजकीय क्षेत्रात जी काही मंडळी नगरपालिका राजकारणाच्या माध्यमातून पुढे आली, त्यापैकी आमदार जेथलिया एक होत. परतूर पालिकेत सदस्यपदी पहिल्यांदा बिनविरोध निवडून आल्यानंतर त्यांची आगेकूच सुरू झाली. सुमारे साडेबारा वर्षे परतूरच्या नगराध्यक्षपदी राहिलेल्या जेथलियांनी नंतर या पदावर आपल्या पत्नीची वर्णी लावली. सध्याही नगराध्यक्षपद त्यांच्या पत्नीकडेच आहे.
जेथलिया मूळ काँग्रेसचेच असले, तरी नगरपालिकेतील सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी त्यांना अनेकदा विरोधी पक्षीयांशी तडजोड कराव्या लागल्या. तालुक्यात असलेली काँग्रेस पुढाऱ्यांची नेतृत्वाची अहमहमिका पाहून जेथलिया यांनी १९९५ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेने त्यांना जालना-औरंगाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी दिली. परंतु त्यांच्या वाटय़ाला पराभव आला. परंतु त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि शिवसेनेच्या माध्यमातून विधान परिषदेवर वर्णी लावून घेतली.
जेथलिया विधान परिषद सदस्य झाले, तेव्हा परतूर विधानसभा मतदारसंघाचे सदस्यत्व भारतीय जनता पक्षाचे बबन लोणीकर यांच्याकडे होते. युतीमध्ये परतूर विधानसभेची जागा भाजपाकडे असेल्याने तेथे आपणास शिवसेनेची उमेदवारी मिळणार नाही, हे स्पष्ट असल्यामुळे जेथलियांनी विधान परिषद सदस्यत्वाचा सर्व काळ वैयक्तिक संपर्क वाढविण्यात घालविला. या काळात त्यांचे आणि भाजपचे कधी जमलेच नाही. त्याआधी म्हणजे २००४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीही जेथलिया आणि भाजपचे उमेदवार बबन लोणीकर यांच्यातील बेबनाव स्पष्ट झाला. युतीमध्ये परतूरची जागा भाजपकडे असली, तरी २००४ मध्ये जेथलिया यांचे कट्टर समर्थक आणि शिवसेनेचे परतूर तालुकाप्रमुख माधव कदम यांनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढविली होती. त्या वेळी कदम यांचा पराभव झाला तरी २७ हजारांपेक्षा अधिक पडली होती. युतीमध्ये ही जागा शिवसेनेकडे नसल्यामुळे २००४ पासूनच जेथलिया यांनी पुढील विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले होते. २००९ मध्ये ते अपक्ष म्हणून उभे राहिले आणि विधानसभा सदस्यपदी निवडून आले. या वेळी काँग्रेस पक्षातील अंतर्गत असंतोष त्यांच्या मदतीला धावून आला. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसचे अन्वर देशमुख यांना उमेदवारी दिली. त्याच पक्षातील बाबासाहेब आकात व गोपाळ बोराडे हे दोघे बंडखोरी करून उभे राहिले होते. या मतविभागणीचा फायदा झाल्याने जेथलिया विधान परिषदेतून विधानसभेत पोहोचू शकले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीचे वैशिष्टय़ म्हणजे ४२ टक्के मते घेणारे शिवसेना उमेदवार अर्जुन खोतकर (घनसावंगी), ४० टक्के मते घेणाऱ्या भाजपच्या निर्मला दानवे (भोकरदन) आणि ३८ टक्के मते मिळविणारे शिवसेनेचे उमेदवार भास्कर अंबेकर (जालना) हे जिल्ह्य़ात पराभूत झाले होते. परंतु त्याचवेळी २५ टक्के मिळविणारे जेथलिया मात्र परतूरमधून निवडून आले होते. काँग्रेसच्या मतविभागणीमुळे विधानसभेवर निवडून येताच जेथलियांनी आपला पाठिंबा काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जाहीर करून टाकला होता. मराठवाडय़ातील व्यक्ती मुख्यमंत्री होत असल्याने आपण त्यांच्यासोबत राहणार आहोत, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. धन्यवाद मतदारसंघातील काँग्रेसमधील बंडखोरांना, कृतज्ञता शिवसेनेबद्दल आणि मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा अशोक चव्हाण यांना अशी काहीशी भूमिका जेथलियांची त्या वेळी होती. परतूरची खासदारकी शिवसेनेकडे असल्याने स्थानिक पातळीवर शिवसेनेसोबत असतात, पालकमंत्री राष्ट्रवादीचे असल्याने जिल्हा पातळीवर ते राष्ट्रवादीशी सलगी ठेवतात आणि मुख्यमंत्री काँग्रेसचे असल्याने मुंबईत गेल्यावर जेथलिया त्या पक्षाचे असतात, असे विनोदाने म्हटले जाते.
असे हे जेथलिया आता काँग्रेसमध्ये जाणार आहेत. त्यामागील कारणही स्पष्ट आहे. परतूरमधून त्यांना २०१४ मध्ये काँग्रेसची उमेदवारी हवी आहे. मागील तीन निवडणुकांपासून हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात नाही. त्यामुळे ही जागा ताब्यात घेण्यासाठी काँग्रेसला निवडून येण्याची क्षमता असणारा उमेदवार हवा आहे. त्या दृष्टीने त्यांची ही वाटचाल आहे. दीड तपापूर्वी काँग्रेसपासून दूर गेलेले जेथलिया आता परत त्या पक्षाच्या वाटेवर आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 10th May 2013 रोजी प्रकाशित
आमदार जेथलिया पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर!
परतूर विधानसभा मतदारसंघातील अपक्ष आमदार सुरेश जेथलिया काँग्रेसच्या वाटेवर आहेत. काँग्रेसमध्ये आपण प्रवेश करणार हे सांगण्यासाठी त्यांनी मंगळवारी थेट काँग्रेसच्या जिल्हा मेळाव्याचे व्यासपीठ गाठले.
First published on: 10-05-2013 at 01:06 IST
मराठीतील सर्व मराठवाडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mla jethliya on the way of congress