शहरातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयातील काही अध्यापक खासगी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याने महाविद्यालयाच्या रुग्णालयातील आरोग्य सेवेवर परिणाम होऊ लागला आहे.
खासगी व्यवसाय करणाऱ्या अध्यापकांवर कारवाई करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे करण्यात आली आहे. या संदर्भात वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत बोर्डे यांना निवेदन देण्यात आले आहे.
वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत अध्यापकांना व्यवसाय भत्त्याऐवजी वैद्यकीय व्यवसाय करण्याची सवलत देण्यात आली होती, मात्र ऑगस्ट २०१० च्या शासन आदेशानुसार वैद्यकीय व्यवसायाची सवलत रद्द करण्यात आली.
असे असतानाही वैैद्यकीय महाविद्यालयीन अध्यापक सर्रासपणे खासगी वैद्यकीय व्यवसाय करताना दिसून येत आहेत. त्यामुळे शासकीय नियमांची पामयल्ली होत आहे. तसेच खासगी वैद्यकीय व्यवसाय न करण्यासाठी अध्यापकाला शासनाकडून व्यवसाय अवरोध भत्ता देण्यात येत असतो.
त्यांच्याकडून त्यासाठी प्रपत्र भरून घेतले जाते. त्यात कोणत्याच प्रकारचा खासगी वैद्यकीय व्यवसाय करीत नसल्याचे नमूद केलेले असते, मात्र असे असताना दीड वर्षांपासून संबंधित अध्यापकांनी प्रपत्र सादर केलेले नाहीत. राजकीय आश्रय व वरिष्ठांची मर्जी असल्याने वैद्यकीय अध्यापकांचे खासगी क्षेत्रातील व्यवसाय सर्रासपणे सुरू आहे.
अशा वैद्यकीय अध्यापकांविरुद्ध तातडीने महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या तरतुदीनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात मनसेच्या येथील शाखेच्या वतीने वैद्यकीय अधीक्षक डॉ. बोर्डे यांच्याशी चर्चा करण्यात आली. आठ दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा अनिल शिरसाठ, किरण नगराळे, अजित राजपूत, संदीप जडे, रावसाहेब कदम आदींनी दिला आहे.