इंटरनेटचा वेग वाढवणारे अत्याधुनिक ‘४-जी’ तंत्रज्ञान उंबरठय़ावर असतानाच मुंबई महापालिकेने मोबाइल टॉवरसाठी धोरण आणले आहे. ‘४-जी’ तंत्रज्ञानासाठी मोबाइल टॉवरची किरणोत्साराची मर्यादा दुपटीने वाढवण्याची परवानगी केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाने दिली असताना महापालिकेच्या धोरणात किरणोत्सार आणि टॉवरच्या संख्येवर मर्यादा ठेवणाऱ्या तरतुदी असल्याने आता मुंबईत ‘४-जी’चे तंत्रज्ञान आणि मोबाईल टॉवरचा तिढा निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
सध्या मुंबईतील सुमारे ५० टक्के टॉवर अनधिकृत असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात येते. प्रत्येक मोबाइल टॉवरला ४५० मिलिवॅट्स प्रति चौरस मीटर किरणोत्सर्गाची मर्यादा घालून देण्यात आली आहे. (‘४-जी’साठी ही मर्यादा ९०० मिलिवॅट्स प्रति चौरस मीटर करण्यात आली आहे.) मात्र एकाच इमारतीवर आठ ते दहा मोबाइल टॉवर्स असल्याने परिसरातील किरणोत्सर्गाचे प्रमाण दहापटीने वाढते. हा किरणोत्सर्ग लहान मुले व रुग्णांसाठी अधिक धोकादायक ठरत असल्याचे सांगत पालिका प्रशासनाने मोबाइल टॉवरसाठी नवे धोरण तयार केले आहे. हे धोरण सुधार समितीत चच्रेला येणार आहे. सुधार समिती तसेच पालिकेच्या मुख्य सभागृहाची मान्यता तसेच राज्य सरकारची मान्यता मिळाल्यावर त्याची अंमलबजावणी सुरू होईल.
प्रत्येक इमारतीवर एकच मोबाइल टॉवर लावावा तसेच दोन मोबाइल टॉवरमध्ये किमान ३० मीटरचे अंतर असावे, असे पालिका धोरणात म्हटले आहे. मोबाइल टॉवरसाठी सोसायटीतील ७० टक्के सदस्यांची मान्यताही आवश्यक आहे. हे धोरण राबवल्यास मोबाइल कंपन्यांचे सध्या अस्तित्वात असलेले नेटवर्कच कोलमडून जाण्याची शक्यता आहे. मुंबईतील अनेक इमारतींवर सध्या आठ ते दहा मोबाइल टॉवर लावलेले असून किरणोत्सर्गाच्या भीतीने अनेक सोसायटी सदस्य टॉवर लावून घेण्यास तयार नाहीत.
त्यातच ‘४-जी’ तंत्रज्ञानासाठी अधिकाधिक टॉवर लावण्यासाठी मोबाइल कंपन्या प्रयत्न करत आहेत व त्यासाठी दूरसंचार विभागावरही कंपन्या दबाव टाकत आहेत. मोबाइल टॉवरचा आरोग्यावर परिणाम होत नसल्याचे पुस्तकही कंपन्यांकडून नुकतेच प्रकाशित झाले आहे व जागतिक आरोग्य संघटना तसेच काही तंत्रज्ञांचे दाखलेही देण्यात आले आहेत. मात्र मोबाइल टॉवरविरोधी भूमिका घेणाऱ्या कार्यकर्त्यांनी हा मोबाइल कंपन्यांचा बनाव असल्याचे सांगत पालिकेच्या धोरणाला पािठबा दाखवला आहे.

मोबाइल टॉवरमधून बाहेर पडणारा किरणोत्सर्ग २४ तास असतो. त्यामुळे त्याची तुलना कधीतरी बाहेर पडणाऱ्या किरणोत्सर्गाशी करता येणार नाही. या किरणोत्सर्गामुळे टॉवरजवळ राहणाऱ्या रहिवाशांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. केंद्राने मोबाइल टॉवरची किरणोत्सर्ग क्षमता दुपटीने वाढवल्याने तर परिस्थिती अधिकच चिंताजनक होईल
    गिरीशकुमार, प्राध्यापक ‘आयआयटी’

 ‘३-जी’ नेटवर्कसाठी मोबाइल टॉवरमधून होत असलेला किरणोत्सर्गच एवढा जास्त आहे की ‘फोर जी’ नेटवर्कचे परिणाम त्याहून अधिक भयंकर असतील. आमचा मोबाइल टॉवरना विरोध नाही. मात्र, मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्यास टॉवरच्या नियमनाबाबत पालिका तसेच केंद्राने गांभीर्याने विचार करायला हवा
    प्रकाश मुन्शी, ‘सिटिझन ग्रुप’

मुंबईत आताही मर्यादेपेक्षा अधिक तीव्रतेने किरणोत्सर्ग करणारे टॉवर आहेत. मात्र त्यावर लक्ष ठेवण्यासाठी व नियमन करण्यासाठी केंद्रीय दूरसंचार विभागाकडे मनुष्यबळ नाही. ‘४-जी’ तंत्रज्ञानासाठी किरणोत्सर्ग मर्यादा वाढवली जात असताना तर प्रत्येक इमारतीवर एकापेक्षा अधिक टॉवर लावले जाऊ नयेत
    विनोद शेलार, भाजपाचे नगरसेवक