नगर पंचायत समितीच्या जेऊर गणाच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंद खंडू मोकाटे (५ हजार ४३४ मते) ७५ मातधिक्याने विजयी झाले. त्यांनी भाजपच्या सुमन रामदास आव्हाड (५ हजार ३५९ मते) यांचा पराभव केला. या पराभवाने भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांना जोरदार धक्का बसला आहे. कर्डिले यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीने मुसंडी मारुन त्यांना धोबीपछाड दिला. काँग्रेसने या निवडणुकीत उमेदवार दिला नव्हता व प्रचारात भाग न घेता तटस्थ भुमिका घेतली होती.
पंचायत समिती सदस्य रामदास आव्हाड यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक झाली. भाजपने त्यांच्याच पत्नी सुमन यांना उमेदवारी देऊन सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, तो यशस्वी झाला नाही. भाजप-सेना युती व राष्ट्रवादीनेही ही पोटनिवडणूक प्रतिष्ठेची केली होती. कर्डिले यांच्यासह भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. राम शिंदे यांनी प्रचार यंत्रणा राबवली. कर्डिले यांनी तर घरोघर जाऊन प्रचार केला. राष्ट्रवादीचे पालकमंत्री बबनराव पाचपुते, जिल्हाध्यक्ष घनश्याम शेलार यांनीही प्रचार सभा घेतल्या. राहुरीचे माजी आमदार प्रसाद तनपुरे यांचे चिरंजीव प्राजक्त यांनी येथे प्रचार यंत्रणा राबवली. प्राजक्त यांच्यावर टाकलेली पहिलीच जबाबदारी त्यांनी यशस्वी पार पाडून दाखवली. जेऊर गणाने यापुर्वी सातत्याने कर्डिले यांची पाठराखण केली होती. राहुरी विधानसभा मतदारसंघात या गणाचा समावेश होतो. घाटावरील गावे व घाटाखालील गावे हा वाद तसेच जातीय समीकरणे निवडणुकीत महत्वाची ठरली.
मोकाटे व आव्हाड यांच्यात सरळ लढत झाली. काल शांततेत ६२ टक्के (१० हजार ७९३) मतदान झाले. आज सकाळी निवडणूक अधिकारी नितीन गवांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात मतमोजणी झाली. मोकाटे यांच्या विजयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला.