केंद्र शासनाचे कोटय़वधीचे अनुदान अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने संत्रा गुणवत्ता केंद्रावर खर्च केल्यानंतर पुन्हा त्याच केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करवून घेण्याचा विद्यापीठ कुलगुरूंचा निर्णय हास्यास्पद ठरला आहे. उद्या, बुधवारी सकाळी ९.३० वाजता संत्रा गुणवत्ता केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि कृषी व महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याच्या निमंत्रण पत्रिकांचे वाटपही करण्यात आले.
एकूणच हा प्रसिद्धी लाटण्याचा प्रकार असल्याची टीका कुलगुरू डॉ. रविप्रकाश दाणी यांच्यावर होत असून मुख्यमंत्रीही त्यांच्या संपूर्ण कृतीमध्ये सामील झाल्याने हा प्रकार हास्यास्पद ठरला आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि पुण्याचे महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषध वनस्पती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा उद्घाटन कार्यक्रम अमरावती मार्गावरील भरतनगरच्या संत्रा गुणवत्ता केंद्रावर आयोजित करण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या कृषी विभागातर्फे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत अकोल्याच्या कृषी विद्यापीठाला संत्रा गुणवत्ता केंद्राचा प्रकल्प मिळाला. इंडो-इस्त्राईल संबंधांवर आधारित हा प्रकल्प होता. त्यानुसार भारताचे आर्थिक साहाय्य आणि इस्त्राईलचे तंत्रज्ञान वापरून हे केंद्र उभारायचे होते. डॉ. डी.एम. पंचभाई या प्रकल्पाचे प्रमुख होते. माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे यांचा कार्यकाळ त्यावेळी संपत आला होता. विद्यापीठाला प्रकल्पही मिळाला. त्यासाठी अनुदान मिळाले. ते अनुदानही खर्चही झाले. खर्चाचे अंकेक्षण करण्यात आले. सध्या या केंद्रातील संत्र्याची झाडे साडेतीन ते चार वर्षांची झाली आहेत. केंद्र शासनाने या प्रकल्पासाठी विद्यापीठाला साडेतीन कोटी रुपये देऊ केले होते. आश्चर्य म्हणजे पैसा खर्च करताना त्यात बऱ्याच अनियमितता झाल्याचा ठपका अंकेक्षणात ठेवण्यात आला होता. प्रकल्प सुरू होऊन तो पूर्ण झाल्यावर मुख्यमंत्री त्याचे उद्घाटन करणार काय अशी चर्चा विद्यापीठात रंगली आहे. ज्या अभियानांतर्गत हे केंद्र सुरू करण्यात आले त्याचा कालावधी केव्हाच संपुष्टात आला आहे.
दरम्यान, आधी संत्र्यांची लागवड केली. आता संत्रा गुणवत्ता केंद्राचे उद्घाटन करीत आहोत, अशी प्रतिक्रिया या प्रकल्पाचे प्रमुख प्रा. डॉ. डी.एम. पंचभाई यांनी