कॅरी ऑनसाठी गेल्या दोन आठवडय़ांपासून विद्यापीठाला वेठीस धरून लोकांना स्वत:कडे आकृष्ट करण्याचा स्टुडंट ऑर्गनायझेशन फॉर नागपूर युनिव्हर्सिटी(एसओएनयू) या विद्यार्थी संघटनेचा बेत पुरता फसला आहे. विद्यापीठाने भूमिकेवर ठाम राहून आंदोलकांना मुळीच दाद दिली नाही. राजकीय पक्षांनीही आंदोलन ‘हायजॅक’ करण्याचे प्रयत्न केले. परंतु, यात त्यांनाही यश आले नसल्याचेच चित्र उमटले आहे.
विद्यार्थ्यांचे कॅरी ऑनसाठीचे आंदोलन गैरलागू ठरवून विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न केले असतानाही ‘कॅरी ऑन’साठी विद्यार्थी आणि त्यांच्या आडोशाने आंदोलनाला खतपाणी घालणारी महाविद्यालये दोन आठवडय़ापासून आंदोलन चालवित होती. या आंदोलनामध्ये हिंदी भाषक विद्यार्थ्यांचा कंपू मोठय़ा संख्येने कार्यरत होता. कॅरी ऑनची मागणी करणारे अभियांत्रिकीचे विद्यार्थी अगदीच नाममात्र संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. एसओएनयू या कंपूचे कॅरी ऑनसाठी सुरू असलेल्या आंदोलनाचे कव्हरेज करण्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रॉनिक प्रसार माध्यमांनाही वाईट अनुभव आल्याने त्यांनी या आंदोलनाला प्रसिद्धी देणे गेल्या काही दिवसांपासून थांबवले होते. काही स्थानिक संघटनांच्या मदतीने एसओएनयूने आंदोलन रेटण्याचा प्रयत्न केला.
विद्यापीठाने परीक्षा मंडळ, विद्याशाखा, विद्वत परिषद आणि अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्याची एकत्र बैठक बोलावून ‘कम्प्लिट करिकुलम’ योजना आणली. ही योजनेतील विद्यार्थ्यांचा करिकुलम पूर्ण करण्याची जबाबदारी महाविद्यालयांनी पार पाडायची आहे, असे कुलगुरू डॉ. विलास सपकाळ एकीकडे म्हणत असतानाच दुसरीकडे विद्यार्थी कॅरी ऑनच्या मागणीसाठी अडून होते. विद्यापीठाने गेल्यावर्षीपासून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार सेमिस्टर पॅटर्न व श्रेयांक पद्धत सुरू केली आहे. अभ्यासक्रम बदलताना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा मिळावा, यासाठी ‘विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची’ पद्धत विद्यापीठाच्या विचाराधीन होती. मात्र, कॅरी ऑन आंदोलन तोवर सुरू करण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करीत विद्यापीठाने नियमांची जुळवाजुळव करीत ‘कम्प्लिट करिकुलम’ अंमलात आणायचे ठरवले. त्यानुसार विद्यार्थ्यांला पुढील वर्षांत प्रवेश घेणे शक्य आहे. अर्थात ज्या सेमिस्टरमध्ये विद्यार्थी प्रवेश घेईल त्या वर्षांची पात्रता पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर होती. विद्यार्थ्यांच्या प्रवेशाबाबत महाविद्यालयांना पुढील जबाबदारी देण्यात आली. याबाबतीत निर्णय घेण्यासाठी विविध प्राधिकरणांची सहमती होती. मात्र विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच राहिले. आंदोलनाचा काहीही उपयोग होत नसल्याचे पाहून गुरुवारी त्यांनी प्र-कुलगुरूंची गाडी रोखली. आम आदमी पार्टीच्यावतीने अॅड. भोयर आणि त्यांचे सहकारी त्याठिकाणी आले. त्यांनी विद्यापीठाची नवीन योजना विद्यार्थ्यांना मान्य असल्याचे सांगितले. कुलगुरूंनी स्वत: येऊन उपोषणकर्त्यांना फळांचा रस पाजावा, मागणी विद्यार्थ्यांनी केली. प्र-कुलगुरू, कुलसचिवांनी उपोषणस्थळी भेट दिल्यानंर पुन्हा विद्यार्थ्यांनी कॅरी ऑनचा धोशा लावल्याने प्र-कुलगुरू व कुलसचिव उपोषणस्थळावरून निघून आले. शेवटी आंदोलनकर्त्यांची नाचक्की होऊन स्वत:च ज्युस पिऊन त्यांनी उपोषण सोडले.