निसर्गापुढे माणसाचे काही चालत नाही. नैसर्गिक आपत्तीपुढे आपण सारेच हतबल ठरतो. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर निसर्गावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो, तशी प्रगती साधता येऊ शकते. केदारनाथमधील प्रलय हा केवळ नैसर्गिक नव्हता तर मानवाच्या अतिहस्तक्षेपानेही घडला आहे, असे मत व्हीएनआयटीचे प्रा. यशवंत काठपातळ यांनी व्यक्त केले.
असोसिएशन अॉफ कन्सलटिंग सिव्हील इंजिनिअर्सच्या वतीने सायंटिफिक सभागृहात अभियंता दिनानिमित्त पी.टी. मसे स्मृती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ‘उत्तराखंड आपदा : वैज्ञानिक विश्लेषण व चिंतन’ या विषयावर डॉ. काठपातळ बोलत होते.
केदारनाथ येथे प्रलय झाला त्यावेळी तेथे नेमके काय झाले आणि कसे घडले याचे संपूर्ण वर्णन त्यांनी चित्रफितीद्वारे समजावून सांगितले. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्सगावर मानवाने आक्रमण केले असल्यामुळे निसर्गाचा एक प्रकारचा आदर राखला गेला नाही. केदारनाथचा परिसर हा भूकंप प्रवण असून ग्लेशियर्समुळे तेथील पर्वतांची स्थिती सतत बदलत असते. याशिवाय भूगर्भ हा उत्तरेकडे सरकत असतो. आणि त्यामुळे उत्तर भागात तो नवी जागा शोधतो. याच कारणाने प्रत्येक वर्षी हिमालयाची उंची ४ मीटरने वाढत असते. भूकंपप्रवण असलेल्या केदारनाथ परिसरात उत्तराखंड सरकार ८०० बांध बांधते आहे. विद्युत प्रकल्पांचे काम सुरू असल्यामुळे सतत भूसुरुंग लावले जात असतात. हे सारे निसर्गनियमांच्या विरुद्ध आहे. मंदाकिनी नदीचा प्रवाह थांबला आणि आजूबाजूच्या पर्वतांमध्ये एका धरणाइतके पाणी साचले. पाण्याला थोडी जागा मिळाली आणि एक प्रवाह त्यातून बाहेर पडला. प्रचंड दाबाने पाण्याला साठवून ठेवणारा पर्वतच कोसळला. परिणामी पाणी वेगाने केदारनाथकडे आले. त्यामुळे या प्रवाहात जे आले ते संपूर्ण वाहून गेले. अशा प्रकारच्या घटना कुठेही घडू शकतात. याला कारण आपण निसर्गाचा आदर करत नाही, असे डॉ. काठपातळ म्हणाले.
कार्यक्रमाला संदीप शिरखेडकर, सुमंत मुंडले, सारंग परांजपे आणि मसे कुटुंबीय उपस्थित होते. मीनल देहाडराय हिने कार्यक्रमाचे संचालन केले.