नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारणीत स्वारस्य असणाऱ्या जागतिक कंत्राटदारांना त्यांची पात्रता विनंती प्रस्ताव सादर करण्याची बुधवारी शेवटची मुदत असून यासाठी वीस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निविदाकारांनी सिडकोकडून स्वारस्य पात्रता प्रस्तावासाठी यापूर्वी रस दाखविला आहे. या कंत्राटदारांपैकी पात्रताधारक कंत्राटदारांना नवी मुंबईतील अत्याधुनिक आणि अद्ययावत असा ग्रीनफिल्ड विमानतळ उभारणीसाठी निविदा दाखल करण्याची संधी मिळणार आहे. हा संपूर्ण प्रकल्प खासगी आणि सरकारी सहभागातून उभारला जाणार आहे.
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला पर्याय ठरू पाहणाऱ्या नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाचा विचार १८ वर्षांपूर्वी करण्यात आला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आडमुठे धोरणामुळे हा प्रकल्प पाच वर्षे रखडला. त्यानंतर जुलै २००७ रोजी या प्रकल्पाला हवाई वाहतूक मंत्रालयाने मंजुरी दिली. २२६८ हेक्टर जमिनीवर उभारण्यात येणाऱ्या या विमानतळासाठी लागणाऱ्या सर्व केंद्रीय व राज्य परवानगीचे सोपस्कार आता पूर्ण झालेले आहेत. विमानतळाच्या जागेत येणाऱ्या १४ गावांतील ६७१ हेक्टर जमिनीचे संपादन प्रक्रिया सुरू असून सिडकोने सर्वोत्तम पॅकेज दिल्याने प्रकल्पग्रस्तांनी संमतीपत्र देण्यास सुरुवात केली आहे. विमानतळ उभारणीत हा सर्वात मोठा अडथळा मानला जात असल्याने गतवर्षी फेब्रुवारी महिन्यात काढण्यात आलेली पात्रता विनंती प्रस्ताव तीन वेळा पुढे ढकलावे लागले होते. बुधवारी २८ जानेवारी रोजी हे स्वारस्य पात्रता विनंती प्रस्ताव सादर करण्याची शेवटची मुदत असून यात झुरीच एअरपोर्ट, जेन्सलर, फेअरोव्हेल, टाटा, मुंबई इंटरनॅशनल, एसआरईआय इन्फ्रा, आयएल अ‍ॅण्ड एफएस, जीएमआर ग्रुप, वॉलनट एव्हिएशन, सोलॅक्स करसन, आयआरबी यासारख्या वीस देश, विदेशातील बांधकाम कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. विमानतळ विकासक असलेल्या या वीस कंपन्या बुधवारी आपल्या पात्रता कागदपत्रांची तसेच आर्थिक क्षमतेच्या निविदा दाखल करणार आहेत. यात रचना, बांधा, वापरा, वित्तपुरवठा या सर्व कामांचा समावेश राहणार आहे. यात पात्र ठरणाऱ्या विकासकांना ग्लोबल निविदा भरण्याची संधी दिली जाणार असून हा चार महिन्यांचा कालावधी राहणार आहे. त्यानंतर विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असून त्यासाठी जून महिना उजाडणार आहे. १४ हजार ५७३ कोटी रुपये खर्चाचा हा विमानतळ खासगी आणि सरकारी सहभागातून उभारला जाणार आहे. या वर्षी त्याच्या कामाला सुरुवात झाल्यास डिसेंबर २०१९ पर्यंत या विमानतळावर पहिले उड्डाण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.