चार प्रमुख पक्षांच्या या हालचाली सुरू असताना पक्षांनी इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरून घेतले असताना मनसेने एकाही उमेदवाराचा अर्ज स्वीकारलेला नाही. विधानसभेत केवळ एक आमदार आणि नवी मुंबईत नऊ हजारांचा पल्ला गाठता आल्याने नाउमेद झालेला मनसे पक्ष काय करीत आहे याची चर्चा सुरू झाली आहे. या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे एकीकडे कार्यकर्त्यांच्या शिडात हवा भरण्याचे काम करीत असताना नवी मुंबईबाबतीत मात्र चुप्पी साधून असल्याने कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. पक्षाच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांची भेट घेतली; पण त्यांना वाटाण्याच्या अक्षता लावण्यात आल्या. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, सावंत यांच्याशी बोलण्यात यावे, असे सांगून त्यांना वाटेला लावण्यात आले. त्यानंतर एकाही इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती घेण्यात आलेल्या नाहीत, तर निवडणूक लढवायची की नाही याबाबत ब्र काढला जात नाही, त्यामुळे आम्ही करायचे काय, असा सवाल या पक्षातील कार्यकर्त्यांचा आहे. मनसेने ही निवडणूक न लढविल्यास त्याचा फायदा शिवसेनेला होणार आहे. त्यामुळे राज्यात न झालेली दोन भावांची युती या शहरात झालेली दिसून येणार आहे. या युतीचा फटका राष्ट्रवादीला बसणार हे निश्चित आहे.