निवडणुका कोणत्याही असोत, त्या जिंकण्यासाठी उमेदवार काहीही करू शकतात. त्यात मतदारराजाला आकर्षित करण्यासाठी कोपरखैरणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने दहा-बारा एकगठ्ठा मते देणाऱ्या कुटुंबांत चक्क एसी लावून दिले आहेत. दोन दिवस अवकाळी पावसामुळे गारगार वाटत असले तरी उन्हाने जीव नकोसा केला आहे. त्यामुळे अशा वेळी एखाद्या उमेदवाराने एसी म्हणजे आपले वातानुकूल यंत्र लावून देण्याचे आश्वासन दिले तर कोण नाही म्हणणार आहे. विशेष म्हणजे या उमेदवाराने केवळ आश्वासन दिले नाही, तर चक्क सहा कुटुंबांना एसी लावूनदेखील दिले. त्यात काही सोसायटींच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. एसीच्या थंड हवेत आता त्या उमेदवाराला २२ एप्रिल रोजी मतदान करण्याची चर्चा केली जात आहेत. त्यासाठी आपल्याकडे असलेल्या मतदारांना तो उमेदवार कसा चांगला आहे ते पटवून दिले जात आहे. निवडणुकीअगोदर काही उमेदवारांनी त्यांच्या परिसरात ‘वायफाय’ लावून दिले. आमदारकीच्या निवडणुकीपासून हा फंडा सुरू झाला आहे. त्यानंतर अनेक उमेदवारांनी वेगवेगळ्या क्लृप्त्या शोधून काढल्या. कोणी कुकर भेट दिले, तर कोणी क्रोकरीचे बॉक्स वाटले. कोणी ईमेजिका टूर, तर कोणी देवदर्शन करून आणले. त्यामुळे नवी मुंबईतील मतदारांची गेली दोन-तीन महिने मज्जाच मजा आहे. त्यात आता हा एसीचा फंडा एका उमेदवाराने अमलात आणला आहे. काही जण म्हणे हापूस आंब्याच्या पेटय़ादेखील भेट देत आहे. एकंदरीत उमेदवार आपल्या ऐपतीप्रमाणे मतदारांना आकर्षित करीत असून एसीचा फंडा मात्र पहिल्यांदाच पाहण्यास मिळाला आहे.