सोलापूर जिल्हय़ात यंदा कडाक्याच्या थंडीतही पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत असून, संपूर्ण जिल्हय़ासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे शेती धोक्यात आली आहे. उजनी धरणात पुणे जिल्हय़ातून पाणी सोडण्याच्या मागणीवर जिल्हय़ातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्थानिक पातळीवर आक्रमक होतात. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ब्र न काढता अक्षरश: नांगी टाकतात, असे चित्र दिसून येते. पवार यांचे मांडलिकत्व पत्करल्याचा हा परिणाम असून त्यामुळे सोलापूर जिल्हय़ासाठी कोणी राजकीय वाली उरला नसल्याची प्रतिक्रिया शेतकरीवर्गातून व्यक्त होत आहे.
उजनी धरणातील पाण्याची पातळी खूपच खालावली असून, यात काही राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाला बळी पडून या धरणातील तब्बल ५२ टीएमसी पाणी नियमबाहय़ पद्धतीने सोडण्यात आले आहे. हे प्रकरण माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी उचलून धरताना संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे. उजनी धरणातील उपलब्ध असलेला अत्यल्प पाणीसाठा केवळ पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला असला तरी सद्य:स्थितीत धरणातून शेतीसाठी पाण्याची एक पाळी सोडली जाऊ शकते, असा स्थानिक लोकप्रतिनिधींचा आग्रह आहे. तसेच प्राप्त परिस्थितीत उजनी धरणात पुणे जिल्हय़ातील धरणातून पुरेशा प्रमाणात पाणी सोडण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या प्रश्नावर माढय़ाचे राष्ट्रवादीचे अजित पवार समर्थक आमदार बबनराव शिंदे यांनी तर आक्रमक पवित्रा घेत आमदारकीवर ‘पाणी’ सोडण्याचा इशारा दिला होता. जिल्हय़ात ठिकठिकाणी सत्ताधारी राष्ट्रवादीच्या आजी-माजी आमदारांनी व अन्य नेत्यांनी रास्ता रोको व अन्य स्वरूपाची आंदोलने केली आहेत.
या पाश्र्वभूमीवर गेल्या दहा दिवसांपूर्वी नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाप्रसंगी सोलापूर जिल्हय़ातील आमदारांची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली. या बैठकीत उजनी धरणातून शेतीसाठी पाणी सोडण्याबाबत विचारविनिमय झाला. परंतु स्वत: अजित पवार यांनी याबाबतच्या अंतिम निर्णयाचा चेंडू मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोर्टात टोलवला. त्यांनी स्वत: उजनी धरणातून पाणी सोडण्याबाबत नकारात्मक भूमिका मांडली. एवढेच नव्हेतर उजनी धरणात पुणे जिल्हय़ातून पाणी सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे ठणकावले. सोलापूर जिल्हय़ासाठी पाणी पाहिजेच असेल तर त्यांनी कर्नाटकातील आलमट्टी धरणाकडे बोट दाखविले. अजित पवार यांचा एकूणच नकारात्मक पवित्रा पाहून त्यांचेच मांडलिक असलेली सोलापुरातील आमदार मंडळी थंड झाली. नव्हे, त्यांनी अजित पवार यांच्याशी कोणताही प्रतिवाद न करता अक्षरश: नांगी टाकल्याचे दिसून आले.
दरम्यान, येथे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाणी प्रश्न उपस्थित झाला. या वेळी सर्वच लोकप्रतिनिधी आक्रमक झाल्याचे पाहावयास मिळाले. विशेषत: राष्ट्रवादीच्या आमदारांनी उजनीच्या पाणीप्रश्नावर राणा भीमदेवी थाटात भाषणे केली. या वेळी पालकमंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या मर्यादा पुन्हा एकदा स्पष्ट झाल्या. त्यामुळेच की काय, या बैठकीची सूत्रे विजयसिंह मोहिते-पाटील यांच्याकडे गेली. या बैठकीत उजनी धरणाच्या पाणीप्रश्नावर जवळपास सर्वानीच कळवळा दाखविला. परंतु प्रत्यक्षात हा कळवळा आणि त्याबद्दलची आक्रमकता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर दाखविली जात नाही, ही बाब स्थानिक लोकप्रतिनिधींची विशेषत: राष्ट्रवादीच्या आमदारांचा ढोंगीपणा तथा दुतोंडीपणा अधोरेखीत करते, असा शेरा जाणकार मंडळींनी मारला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 28th Dec 2012 रोजी प्रकाशित
राष्ट्रवादीचे आमदार गावात आक्रमक; अजित पवारांपुढे मात्र सपशेल नांगी..
सोलापूर जिल्हय़ात यंदा कडाक्याच्या थंडीतही पाण्याचा प्रश्न गंभीर स्वरूप धारण करीत असून, संपूर्ण जिल्हय़ासाठी वरदायिनी ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा अत्यल्प आहे. त्यामुळे शेती धोक्यात आली आहे. उजनी धरणात पुणे जिल्हय़ातून पाणी सोडण्याच्या मागणीवर जिल्हय़ातील सत्ताधारी लोकप्रतिनिधी स्थानिक पातळीवर आक्रमक होतात. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर ब्र न काढता अक्षरश: नांगी टाकतात, असे चित्र दिसून येते.
First published on: 28-12-2012 at 09:30 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ncp mlas powerful in city but bending towards ajit pawar