मागील काही वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसवासी झालेले माजी खासदार डी. बी. पाटील पवार यांनी सोमवारी अंबाजोगाई (जिल्हा बीड) येथे खासदार गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला. नांदेडचे माजी नगराध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ तात्या पाटील त्यांच्यासमवेत होते.
अनेक पक्ष फिरून भाजपत मुंडेनिष्ठ झालेल्या परभणीच्या माजी आमदाराने ‘डी. बीं.’चा भाजप प्रवेश घडवून आणताना भाजपच्या नांदेड जिल्ह्य़ातील काही कार्यकर्त्यांना आमंत्रित करण्याची दक्षता घेतली होती; पण भाजपचे जिल्हा कार्याध्यक्षपद भूषविणाऱ्या राम पाटील रातोळीकर यांना डावलून हा पक्ष प्रवेश सोहळा उरकण्यात आला. यात कटकारस्थान असल्याचे बोलले जाते. मात्र, रातोळीकर यांनी मात्र या प्रकारासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. गोपीनाथ मुंडे हे ८ फेब्रुवारीला नांदेड दौऱ्यावर आले असता माळाकोळी येथे झालेल्या त्यांच्या कार्यक्रमास डी. बी. पाटील हेही प्रमुख पाहुणे होते. या कार्यक्रमात बोलताना ‘डी. बी.’ यांनी आपली ‘मुंडेनिष्ठा’ व्यक्त केली होती. त्यापूर्वी नांदेड विमानतळावर उतरल्यानंतर स्वत: मुंडे यांनी डी. बी. यांच्या भाजप प्रवेशाचे संकेत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिले होते. माळाकोळीच्या कार्यक्रमातच डी. बीं.चा भाजप प्रवेश निश्चित झाला होता. त्यावर अंबाजोगाईत शिक्कामोर्बत झाले. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडण्यास आपण तयार आहोत, असे त्यांनी सांगितले.
२००४ ते २००९ पर्यंत नांदेडचे खासदार राहिलेले पाटील १९९५ ते २००४ दरम्यान विधानसभा सदस्य व युतीच्या राजवटीत काही काळ राज्यमंत्री होते. दीड वर्षांपूर्वी भाजपला रामराम ठोकून त्यांनी मुंबईला जाऊन राष्ट्रवादीत प्रवेश केला. पण ते राष्ट्रवादीत आले कधी आणि आता चालले कोठे ते आपल्याला ठाऊक नसल्याचे राष्ट्रवादीच्या एका पदाधिकाऱ्याने नुकतेच म्हटले. डी. बीं.च्या पक्ष प्रवेशप्रसंगी डॉ. अजित गोपछडे, चैतन्यबापू देशमुख, देवीदास राठोड आदी उपस्थित होते.