News Flash

एनएमएमटी बससेवेला कामोठेवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

रिक्षाचालक आणि स्थानिक राजकारण्यांच्या विरोधामुळे बंद पडलेली कामोठेमधील नवी मुंबई परिवहन सेवेची बस नववर्षांच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा नव्या जोमाने धावू लागली आहे.

| January 2, 2015 02:20 am

रिक्षाचालक आणि स्थानिक राजकारण्यांच्या विरोधामुळे बंद पडलेली कामोठेमधील नवी मुंबई परिवहन सेवेची बस नववर्षांच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा नव्या जोमाने धावू लागली आहे. या सेवेला कामोठेवासीयांनी प्रचंड प्रतिसाद दिला असून पहिल्याच दिवशी बस प्रवाशांनी खचाखच भरली असल्याचे चित्र होते. या बससेवेमुळे रिक्षाचालकांकडून प्रवाशांच्या खिशावर टाकण्यात येणाऱ्या दरोडय़ाला चाप बसणार आहे. या बससेवेला रिक्षाचालकांचा होणारा विरोध पाहता, मोठय़ा प्रमाणात पोलीस बंदोबस्त परिसरात ठेवण्यात आला होता.
रिक्षाचालकांचा विरोध होत असल्याने कामोठे ५७ क्रमांकावर एनएमएमटीचे धाडसी चालक अंबादास वायभासे, किशोर पालवे तसेच वाहक रमशे कांबळे, विजय दरेकर यांची दोन बसवर नेमणूक केली होती. अंबादास हे कामोठे येथेच राहतात. त्यांनीही आज बस चालविताना समाधान व्यक्त केले. प्रादेशिक परिवहन अधिकारी अरुण येवला व एनएमएमटीचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड, आगार व्यवस्थापक उमाकांत जंगले या अधिकाऱ्यांच्या योग्य समन्वयामुळे ही बससेवा खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे.  प्रत्येक थांब्यावरून ही बस पोहचल्यावर बसमधून गणपती बाप्पा मोरया.. जयघोष प्रवाशी करत होते. थांब्यावरील प्रवासीसुद्धा त्याला प्रतिसाद म्हणून तीच घोषणा देत बसमध्ये दाखल होत होते. खांदेश्वर स्थानकात क्रमांक ५७ ची बससेवा सुरू झाल्याचे पाहून वृद्ध महिला प्रवासी शैलजा जाधव यांनी प्रशासनाला धन्यवाद दिले. या बसमधून पहिले उतरणारे प्रवासी शरदचंद्र पेडणेकर हे होते. मानसरोवर रेल्वे स्थानकापासून कृष्णा हॉटेल थांब्यापर्यंत पाच रुपये तिकीट दर तर त्यापुढील प्रवासासाठी सात रुपये तिकीट दर असणार आहेत. दर नऊ मिनिटांच्या कालावधीत ही बससेवा कामोठे वसाहतीच्या अंतर्गत मुख्य रस्त्यावरून धावणार आहे. सुरुवातीचा आठवडाभर ही बससेवा पोलीस बंदोबस्तामध्ये सुरू राहणार आहे. प्रत्येक चालकांकडे पोलीस अधिकाऱ्यांचे मोबाइल नंबर दिले आहेत. ही बससेवा रोखणाऱ्यांवर पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
बसच्या दोन फेऱ्या झाल्यानंतर कामोठे पोलीस ठाण्यात शक्यतेप्रमाणे तीन आसनी रिक्षाचालक येऊन धडकले. त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम मुल्लेमवार यांची भेट घेऊन आपण चर्चा करू त्यानंतर ही बससेवा सुरू करावी असे पोलिसांना सांगितले. मात्र मुल्लेमवार यांनी चर्चा करा मात्र ही बससेवा बंद होणार नाही असेही रिक्षाचालकांना बजावले. दुपारनंतर रिक्षाचालक मोठय़ा संख्येने पोलीस ठाण्यावर जमा झाले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 2, 2015 2:20 am

Web Title: nmmt bus servise get spontaneous response from kamothe resident
टॅग : Nmmt Bus
Next Stories
1 नवी मुंबईत ३२७ तळीरामांवर कारवाई
2 नव्या वर्षांत पर्यावरण संरक्षकांचा संकल्प
3 उरण शहरातील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त
Just Now!
X