सामान्य पनवेलकर प्रवाशांना नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाची (एनएमएमटी) बससेवा मिळू शकणार की नाही, याबाबतचा ठराव शुक्रवारच्या नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत होणार आहे. नगर परिषदेने जाहीर केलेल्या विषयपत्रिकेत १० क्रमांकावर हा विषय चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. उद्या सकाळी साडेअकरा वाजता पनवेलकरांना रेल्वेस्थानकापर्यंत नेण्यासाठी एनएमएमटी बससेवेचा स्वस्त प्रवास करायला मिळणार की नाही, याबाबत नगर परिषदेमधील सदस्य आपआपली मते येथे मांडणार आहेत.
सिटिझन युनिटी फोरमच्या मागणीनंतर हा विषय नगर परिषदेने चर्चेसाठी सभेसमोर ठेवला आहे. हा प्रस्ताव मान्य झाल्यानंतर एनएमएमटी प्रशासन, नगर परिषदेचे अधिकारी, वाहतूक विभाग व प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी बसचा मार्ग व त्यावरील थांबे ठरविण्याचा आराखडा बनविणार आहेत. ही बससेवा सुरू झाल्यास सामान्य पनवेलकरांना सात ते तेरा रुपयांमध्ये रेल्वेस्थानक व महामार्ग गाठता येईल. शुक्रवारी होणाऱ्या या सभेमध्ये बससेवेसोबत अजून ४१ विषयांवर चर्चा होणार आहे. यामध्ये पाण्यासाठी केंद्र सरकारची अमृत योजनेची चर्चा या सभेत होणार आहे. तसेच जलवाहिनीची दुरुस्ती, धार्मिक स्थळांचे आरक्षण व बेकायदा धार्मिक स्थळांची बांधकामे, फडके नाटय़गृहाच्या रंगमंचाला नाव देण्याबाबत, शहरातील काही रस्त्यांना व चौकांना नावे देण्याबाबत, वाचनालयांना अनुदान देण्याचा प्रस्ताव, घनकचरा व्यवस्थापन व हाताळणी व इतर विषय या सभेत मांडण्यात येणार आहेत.