News Flash

एनएमएमटीचे बस थांबे रिक्षाचालकांना आंदण

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने उभारलेले प्रवासी बस थांबे सध्या रिक्षाचालकांनी आपली वाहनतळे केली आहेत.

| August 19, 2015 03:24 am

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेने उभारलेले प्रवासी बस थांबे सध्या रिक्षाचालकांनी आपली वाहनतळे केली आहेत. प्रवासी बसस्थानकावर उभे असतानादेखील मुजोर रिक्षाचालक चक्क बस थांब्याच्या दोन्ही बाजूला बेधडकपणे रिक्षा उभ्या करत असल्यामुळे रिक्षांच्या गर्दीतून बसप्रवाशांना वाट शोधत बस पकडावी लागत आहे. रस्त्यामध्येच रिक्षाचालक रिक्षा थांबवून प्रवाशांची वाहतूक करत असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याच्या घटना घडत आहेत, तर काही वेळेला अपघातदेखील होत आहेत.नवी मुंबई शहरात अधिकृत १०२५० रिक्षा असून प्रत्यक्षात मात्र २५ हजारांपेक्षा जास्त रिक्षा चालतात. यातील अनेक रिक्षा पोलिसांच्या व राजकीय नेत्यांच्या मालकीच्या असल्याने  त्यांच्या आशीर्वादाने महत्त्वाच्या आणि मुख्य मार्गावर रिक्षाचालकांची मुजोरी सहन करावी लागते. नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, कोपरखरणे, नेरुळ, सानपाडा, दिघा, ऐरोली, रबाले, घणसोली, बेलापूर या ठिकाणी १७८ अधिकृत रिक्षा थांबे आहेत. पंरतु प्रत्यक्षात मात्र २२५ रिक्षा थांबे नवी मुंबईत आहेत.परिवहन सेवेने प्रवाशांकरिता लाखो रुपये खर्च करून बस थांबे उभारले आहेत. बस थांब्याजवळ असणाऱ्या गॅरेजमुळे आणि विनापरवाना रिक्षा थांबवण्यात येत असल्याने प्रवाशांना अडचण ठरत आहे. दिघा, साठेनगर येथील बस थांब्याजवळ गॅरेजमुळे या ठिकाणी दिवसाढवळ्यादेखील रिक्षांचा वेढा बसथांब्याला असतो. तुभ्रे नाका येथील ठाण्याच्या दिशेने असणाऱ्या बसथांब्याजवळ खासगी गाडय़ा, माल वाहतूक करणाऱ्या गाडय़ा सर्रासपणे उभ्या केल्या जातात.
ऐरोली स्थानकाच्या पूर्वेस एमआयडीसीचा पट्टा असल्याने दररोज हजारो नागरिकांची ये-जा होत असते. या ठिकाणी रिक्षाचालक हे पदपथावर रिक्षा उभी करून प्रवाशांची वाट पाहात असतात. त्यामुळे पादचाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. हीच परिस्थिती जुईगाव बसथांबा, सानपाडा रेल्वे स्थानकानजीकच्या बसथांब्यांची आहे. पंरतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची उपाययोजना करण्यात आलेली नाही. रिक्षाचालक रिक्षा थांबे नसलेल्या ठिकाणीदेखील प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी रस्त्यातच रिक्षा उभी करून त्यांची वाट पाहतात. त्यामुळे रस्त्यात वाहतूक कोंडी होत आहे आणि  अपघातालादेखील आमंत्रण मिळत आहे. एनएमएमटीच्या अधिकाऱ्याकडे विचारणा केली असता त्यांनी केवळ परिवहनचे बस थांबे उभारण्याचे काम असून थांब्यावर उभ्या असलेल्या रिक्षा हा प्रश्न वाहतूक शाखेच्या अंतर्गत असल्याचे सांगितले. वाहतूक शाखेचे पोलीस मात्र ठाणे-बेलापूर मार्गावरील येणाऱ्या-जाणाऱ्या गाडय़ांची तपासणी दरदिवशी करतात. पंरतु प्रवाशांच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असणारा आणि रिक्षाचालकांच्या मनमानीपणामुळे होणाऱ्या त्रासाची सोडवणूक करण्यासाठी पुढे सरसावत नसल्याची ओरड प्रवाशांकडून होत आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायुगडे यांनी रिक्षाचालकांनी रस्त्यामध्ये अथवा बस थांब्यानजीक रिक्षा उभ्या करत असल्यास त्यावर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी असे सांगितले. वाहतूक शाखेचे उपआयुक्त अरविंद साळवे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला आह.

बस थांब्याजवळ रिक्षाचालक रिक्षा उभी करतात. विशेषत: सकाळच्या वेळेला कामासाठी जाणाऱ्या महिलांना त्रास होतो. त्यातच रिक्षाचलाकांची टवाळेगिरीदेखील आम्हाला सहन करावी लागते. पोलिसांनी बस थांबे रिक्षांपासून मुक्त केले पाहिजेत.
स्नेहल रोडे, प्रवासी.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 3:24 am

Web Title: nmt but stops become rickshaw stop
Next Stories
1 स्थानिक भाज्यांची आवक वाढली
2 पालिकेच्या नवीन नागरी कामांना आधीच्या उधळपट्टीचा फटका
3 अनधिकृत बांधकामांवरील कारवाई अद्याप तळ्यात मळ्यात
Just Now!
X