नागरिकांचे न्याय्य हक्क  व जिव्हाळ्याच्या प्रश्नावर वेळोवेळी आंदोलने करणारी, रस्त्यावर उतरणारी शिवसेना आणि कार्यकर्ते मला हवे आहेत, शिवसेना ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करते, असे शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे. बाळासाहेब यांना अभिप्रेत असणारे हे शिवसैनिक, पदाधिकारी हरवले असल्याचा अनुभव सध्या कल्याण-डोंबविलीतील नागरिकांना येत आहे. वृत्तपत्रातून गाजत असलेल्या रिक्षा मीटरसक्ती आणि मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात कल्याण-डोंबिवलीतील सर्व पदाधिकारी आणि नगरसेवकांनी अळीमिळी गुपचिळी साधली आहे.
कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालकांसाठी मीटरसक्ती लागू करण्यात आली आहे. पण अद्यापही मुजोर रिक्षाचालक प्रवाशाने मागणी केली तर मीटर डाऊन न करता मनमानेल तसे भाडे आकारत आहेत. इतर वेळी वाढदिवस किंवा अन्य काही कारणाने आपली छबी मोठमोठय़ा फलकांवर झळकविणारे शिवसेना पदाधिकारी, नगरसेवक या बाबतीत मात्र मौन बाळगून आहेत. पंधरा दिवस झाल्यानंतरही अद्याप शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून किंवा शिवसेनाप्रणीत रिक्षाचालक-मालक संघटनांकडून याबाबतचे फलक शहरात लावण्यात आलेले नाहीत. कल्याण-डोंबिवलीतील रिक्षातळांवर तरी मीटरसक्ती बाबतचे फलक लावले जातील, अशी नागरिक आणि प्रवाशांची अपेक्षा होती.