कांद्याच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सद्या किरकोळ बाजारात कांद्याने सत्तरी गाठली असून कांदा हा जेवण आणि खाद्यपदार्थाची लज्जत वाढविणारा पदार्थ सध्या सर्वसामान्यांच्या जेवणासह हॉटेलमधील कांदा भजीसह इतर पदार्थातूनही गायब झाला आहे. जेवण व नाश्त्याच्या पदार्थाबरोबर देण्यात येणाऱ्या कांद्याला पर्याय म्हणून कोबी दिला जात आहे. त्यामुळे खवय्यांच्या चवीची लज्जतच गायब झाली आहे.पाऊस व थंडीच्या हंगामात कांद्याच्या उत्पादनात नेहमीच घट होऊ लागली आहे. खरच कांद्याचा तुटवडा निर्माण झाला की, साठेबाजांनी तो केला याचा शोध प्रशासन घेत असले तरी कांदा हा प्रत्येकाच्या खाद्यपदार्थातील महत्त्वाचा घटक असल्याने दरवाढीचा सर्वाधिक फटका सर्वसामान्यांना बसतो.सध्या उरणच्या किरकोळ बाजारात कांद्याने सत्तरी गाठली आहे. त्यामुळे कांदा खरेदी करणाऱ्यांचीही संख्या घटू लागली असल्याची माहिती कांदे विक्रेत्या सखुबाई कदम यांनी दिली आहे. बिकट आर्थिक स्थितीमुळे  वाढीव दराने जास्त कांदा खरेदी करणे शक्य नसल्याचे तिने सांगितले. खरेदी केलेल्या कांद्याची वेळेत विक्री न झाल्यास फायद्याऐवजी नुकसान होण्याची भीतीही तिनेही व्यक्त केली.कांद्याचे दर वाढल्याने कांदा भजी तयार करणेच बंद केल्याचे येथील घरगुती खाद्यपदार्थ विक्रेते समेळ यांनी सांगितले. खास कांद्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या उरणमधील हॉटेलातून थोडय़ाच प्रमाणात कांदा भजी तयार करून त्याची विक्री २० रुपयांऐवजी ३० ते ३५ रुपये प्रति प्लेट विक्री केली जात आहे.या वाढलेल्या दरामुळे ग्राहकांची संख्याही रोडावली आहे. तर दुसरीकडे हॉटेलमध्ये सकाळी नाश्ता करणाऱ्या अनेकांना बटाटावडा प्लेट, उसळ, मिसळ आदी खाद्य पदार्थासोबत मिळणारा कांदा सध्या गायब झाला आहे. त्याऐवजी कोबी चिरून दिला जात असल्याची माहिती उरणमधील खवय्ये महेश घरत यांनी दिली आहे.

इजिप्तचा आयातकांदा वाढविणार पदार्थाची लज्जत
केंद्र सरकारने कांद्याच्या दरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी इजिप्तमधून कांद्याची आयात केली आहे. मागील आठवडय़ात जेएनपीटी बंदरातून ८४ टन कांदा आयात करण्यात आला आहे. तर पुढील आठवडय़ापर्यंत दहा हजार टन कांदा इजिप्तमधून आयात करण्यात येणार असल्याने इजिप्तचा कांदा आता भारतीय खवय्यांची लज्जत वाढविणार आहे.