महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामावर झालेल्या खर्चाचे लेखापरीक्षण करून घेण्याबाबत ९९ ग्रामपंचायतींना कळविण्यात आले. पण त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे लेखापरीक्षण करून घेण्यासाठी आता विशेष शिबिर घेण्याची वेळ जि. प. प्रशासनावर आली आहे. येत्या १९ व २० ऑगस्टला या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्य़ात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना नेहमीच कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय झाली आहे. या कामात गैरप्रकार झाल्याने अनेक ग्रामसेवक, अभियंत्यांवर गुन्हे दाखल झाले. कागदोपत्री बनावट कामे दाखवून अवाच्या सव्वा निधीची मागणी नोंदवली गेली. तपासाअंती बनावट कामाचे पितळ उघडे पडले. वसूलपात्र रक्कम वसुलीसाठी गुन्हे दाखल करण्याचे आदेश हवेतच विरले. रोहयो कामात प्रथम क्रमांकावर असलेला हिंगोली जिल्हा आता २७ व्या क्रमांकावर आहे.
रोहयोअंतर्गत कामाचे लेखापरीक्षण झाले नाही, अशा हिंगोली, औंढा नागनाथ या दोन तालुक्यांतील प्रत्येकी ३२, कळमनुरी २२ व सेनगावच्या १३ ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायतीअंतर्गत रोहयो कामावरील खर्चाचे लेखापरीक्षण होण्यास तालुकास्तरावर १९ व २० ऑगस्टला शिबिर घेण्याची वेळ जि. प. प्रशासनावर आली आहे.