काँग्रेस नेत्याचा कारनामा

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा भवनात उन्हाळी २०१२च्या परीक्षांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल त्वरित जाहीर करावेत म्हणून आज नागपूर शहर काँग्रेस समितीचा(व्हीजेएनटी) शहराध्यक्ष मोहनिश जबलपुरे(यादव) याने तोडफोड केल्याने खळबळ माजली. विद्यापीठाचे मूल्यांकन, पुनर्मूल्यांकनाला झालेला उशीर, विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन आणि दबावात विद्यापीठाने पुढे ढकलेल्या परीक्षा या सर्व एकामागून एक घडणाऱ्या घटना ताज्या असताना आज पुन्हा एकदा पुनर्मूल्यांकनाला उशीर झाल्याचा संताप व्यक्त करून मोहनिशने लक्ष्मीनारायण तंत्रशिक्षण संस्थेतील परीक्षा भवनात तोडफोड घडवून आणली. त्यावेळी परीक्षा नियंत्रक कार्यालयातील कर्मचारी जेवण करीत होते तर परीक्षा नियंत्रक विद्यापीठाच्या दीक्षांत सभागृहात सुरू असलेल्या विद्वत परिषदेत उपस्थित होते.
नागपूर शहर काँग्रेस समितीच्या लेटरहेडवर उन्हाळी परीक्षांच्या पुनर्मूल्यांनाला उशीर झाला असून त्याचे निकाल त्वरित लावण्यात यावेत, अन्यथा परिणामांना सामोरे जावे, अशा आशयाचे निवेदन परीक्षा भवनात सादर करायला मोहनिश आणि आणखी एक तरुण आला होता. त्यांनी निवेदन सादर केले. दोघे बाहेर केले. त्यानंतर पाचच मिनिटात मोहनिश हातात लोखंडी रॉड घेऊन परतला. त्याने परीक्षा नियंत्रक कक्षाच्या बाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर जायला सांगितले आणि त्याने अंधाधुंद तोडफोड करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी सर्वत्र काचांचा सडा पडला होता. यावर परीक्षा नियंत्रक विलास रामटेके म्हणाले, मोहनिश जबलपुरे विद्यापीठाचा विद्यार्थी नाही. अशी तोडफोड करून विद्यार्थ्यांच्या समस्या सुटू शकत नाहीत. विद्यार्थ्यांच्या हितासाठी जेवढे काही करता येईल, तेवढे आम्ही केले आहे.
मोहनिश जबलपुरे म्हणाला, गेल्या महिनाभरापासून विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन कधी प्र-कुलगुरूंकडे, कधी कुलगुरूंकडे तर कधी परीक्षा नियंत्रकाकडे चकरा मारत आहे. बीसीए, बीसीसीएच्या तिसऱ्या वर्षांत उत्तीर्ण असलेल्या मात्र, दुसऱ्या वर्षांत काही पेपरमध्ये नापास असलेल्या विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठात अर्ज केले. अद्याप त्यांचे निकाल घोषित व्हायचे आहेत. त्या विद्यार्थ्यांनी कुणी नागपुरात तर कुणी पुण्याच्या महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घेतले होते. विद्यापीठाच्या चुकीमुळे त्यांचे हे वर्ष वाया जात असल्याने ते ढसाढसा रडायचे. काल, बुधवारी सुट्टी असतानाही कुलगुरूंच्या बंगल्यावर चार तास वाट पाहिली. त्यानंतर व्हिजिंग कार्ड त्याठिकाणी सोडले. सायंकाळी ७.३० वाजता स्वत: कुलगुरूंनी फोन करून काहीही होऊ शकत नसल्याचे सांगितले. यापूर्वी परीक्षा नियंत्रक विलास रामटेके यांचीही भेट घेऊन त्यांना विद्यार्थ्यांच्या समस्या सांगितल्या. पुनर्मूल्यांकनाचे निकाल विद्यापीठ वेळेवर लावणार नसतील तर विद्यार्थ्यांची त्यात काय चूक आहे, असे त्यांना वेळोवेळी सांगितले
मात्र, रामटेके यांनी धुडकावले.