नद्यांच्या उगमस्थानी शुद्ध पाणी असल्यामुळे या परिसरात विकास कामाला प्रतिबंध लावण्याची अधिसूचना राज्य शासनाने २००० मध्ये काढली होती, मात्र नागनदीच्या उगमस्थानी नदीचा लवलेशही नसल्याने या परिसरासाठी ही अधिसूचना मोडीत काढावी, असा प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरण विभागाला पाठविला होता. हा प्रस्ताव पर्यावरण विभागाने फेटाळल्यामुळे लावा गावातच नागनदीचे उगमस्थान आहे, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
लावा ते अंबाझरीपर्यंतचा भाग नागनदीचाच आहे. लावा येथे नदीचे उगमस्थान आहे. पावसाळ्यात या भागातून पाणी वाहते. पावसाळा संपल्यानंतर हा भाग कोरडा होत असल्याने येथेही शहरातील काह बिल्डरची वक्रदृष्टी पडली होती. मात्र हा भाग नदीचे उगमस्थान असल्याची नोंद असल्याने ते रद्द करण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळावर बिल्डर लॉबीने दबाव निर्माण केल्याचे समजते. या दडपणात लावा ते अंबाझरी तलाव परिसरासाठी राज्य शासनाने २००० ची अधिसूचना मागे घ्यावी,  असा प्रस्ताव प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठविल्याची चर्चा होती. त्यामुळे विदर्भ पर्यावरण कृती समिती तसेच इतर पर्यावरण संघटनांनी यास विरोध करीत राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाकडे नागनदीचे उगमस्थान अबाधित ठेवण्याची विनंती केली होती. नुकताच राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला धक्का देत अधिसूचना मोडीत काढण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला. हा प्रस्ताव फेटाळल्याच्या वृत्तास प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उप प्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे यांनी दुजोरा दिला.