विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून उमेदवारी न मिळालेले इच्छुक दावेदारांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे प्रमुख राजकीय पक्षांची अडचण झाली. अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घ्यावे, यासाठी मनधरणी सुरू झाली असून त्यांना विविध आश्वासने दिली जात आहेत.
विदर्भातील ६२ मतदारसंघात विविध राजकीय पक्षातून बाहेर पडलेले किंवा ज्यांचे समाजात स्वतंत्र अस्तित्व आहे, अशी समजूत असणाऱ्या अनेक कार्यकत्यार्ंनी पक्षातून उमेदवारी न मिळाल्याने अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. या अपक्ष उमेदवारांमुळे मोठय़ा प्रमाणात मतांची विभागणी होत असल्यामुळे आता विविध राजकीय पक्षांनी त्यांची मनधरणी सुरू केली आहे. अर्जांची छाननी होऊन नाव मागे घेण्यासाठी १ ऑक्टोबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने मुख्य पक्षांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुख्य पक्षाचे उमेदवार अपक्ष उमेदवारांची मनधरणी करू लागले आहेत. आपले भाव वाढल्याचे दिसून येताच या उमेदवारांनी अटी टाकून मुख्य पक्षाच्या उमेदवारांना बुचकळ्यात टाकले आहेत.
यावेळी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पक्ष स्वतंत्र निवडणूक लढत असले तरी यावेळी अपक्षाची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. शेवटच्या दिवसापर्यंत विदर्भातील ६२ मतदारसंघात २०० हून अधिक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज सादर केले आहेत. सरासरी प्रत्येक मतदारसंघात वीस ते पंचवीस उमेदवार उभे असल्याचे दिसून येते. म्हणजेच, प्रत्येक मतदारसंघात दहा ते बारा उमेदवार अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. अनेकांनी फक्त नावासाठी अर्ज सादर केले आहेत. अपक्ष उमेदवारही बरीच मते मिळवून विजयाचे गणित बिघडवू शकतात, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे दोन ते पाच हजारावर मते घेणाऱ्या अपक्ष उमेदवारांची चाचपणी करून त्यांना अर्ज मागे घेण्याची विनंती केली जात आहे. प्रत्येकाला एकेक मताची किंमत जाणवू लागली आहे.
पूर्व नागपुरातून काँग्रेसचे तानाजी वनवे, दक्षिण नागपूरमधून शिवसेनेचे शेखर सावरबांधे, दक्षिणमधून शिवसंग्रामचे प्रमोद मानमोडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील राऊत, राजू नागुलवार, शहर विकास मंचचे प्रवीण राऊत, कामठी मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे नेते सुरेश भोयर, कारंजातून विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते प्रकाश डहाके यांनी कारंजा, माजी मंत्री बाबासाहेब धाबेकर यांचे चिरंजीव अनिल धाबेकर, जिल्हा परिषद सदस्य आणि भाजपचे सदस्य उकेश चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरले आहेत. याशिवाय, हौशा नवशा कार्यकर्त्यांंची संख्या मोठय़ा प्रमाणात आहेत. अर्ज मागे घेण्यास फक्त दोनच दिवस उरले आहेत.
या अपक्ष उमेदवारांची मते मिळाल्यास तेवढीच मते आपल्या पारडय़ात येतील, असे मुख्य पक्षांना वाटू लागले आहे. त्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप या पक्षाचे उमेदवार अपक्ष उमेदवारांच्या पाठीमागे धाव घेत आहेत. याच स्थितीचा फायदा घेऊन अपक्ष उमेदवार जर-तरची भाषा बोलत आहे. अनेकांच्या मोठय़ा अपेक्षा असल्याचे पाहून मुख्य पक्षाच्या उमेदवारांना घाम फुटत आहेत. काहींनी मताचे मोल जाणून घेऊन आर्थिक गणितही सोडवण्याचा प्रयत्न चालवला आहे, तर काहींनी १ ऑक्टोबरला दुपापर्यंत वाट पाहू, असा पवित्रा घेतला आहे.