डोंबिवली पूर्व भागातील रामनगर रिक्षा स्थानकावर गेल्या काही महिन्यांपासून प्रवाशांच्या रांगा लागत आहे. अर्धा ते पाऊण तास रांगेत उभे राहिल्यानंतर प्रवाशांना रिक्षा मिळते. ही रांग दररोज स्थानक ते रेल्वे स्थानकातील जिन्यावरून फलाट क्रमांक तीनपर्यंत पोहोचलेली असते. या विषयावर वाहतूक पोलीस, आरटीओ, रिक्षा संघटनांचे पदाधिकारी मूग गिळून असल्याने मुजोर रिक्षा चालकांपुढे प्रवाशी हतबल झाल्यासारखे चित्र आहे.  
रामनगर रिक्षा स्थानकावरून आयरे रोड, तुकारामनगर, कोपर पूर्व, सुनीलनगर, डीएनसी शाळा, स्वामी समर्थ मठ, नांदिवली या भागात रिक्षा जातात. डोंबिवलीच्या या विस्तारित भागाचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. या भागात रहिवाशांची वस्ती वाढली आहे. चाकरमान्यांची संख्या त्यामुळे वाढली आहे. या विस्तारित भागात जाण्यासाठी रेल्वे स्थानकापासून प्रवाशांना रिक्षा हा एकमेव उपाय आहे. स्थानकापासून हे विस्तारित भागाचे अंतर जास्त आहे. एक रिक्षा भाडे घेऊन गेल्यानंतर परत रिक्षा थांब्यावर येण्यास २० ते २५ मिनिटांचा कालावधी लागतो. या वाहनतळावर रिक्षांची संख्या कमी आहे. तसेच, मीटर पद्धतीने रिक्षा चालक येण्यास तयार नसतो. शेअर पद्धतीने वाढीव भाडे मिळत असल्याने चालक जोपर्यंत रिक्षेत चार प्रवासी बसत नाहीत तोपर्यंत रिक्षा चालू करीत नाही. अशी अडवणुकीची परिस्थिती रामनगर रिक्षा वाहनतळावर निर्माण झाली आहे. वाहतूक पोलीस कार्यालयाच्या प्रवेशद्वारात हा वाहनतळ आहे. वाहतूक पोलीसही या गंभीर विषयावर काहीही करू शकले नाहीत. या वाहनतळावरून ये-जा करणाऱ्या चालकांना रिक्षा मीटरची सक्ती केली तर रांगांचे प्रमाण कमी होईल. अनेक प्रवासी मीटरप्रमाणे तसेच थेट भाडय़ाचे पैसे देण्यास तयार असतात. रिक्षा चालक तयार नसल्याने प्रवाशांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते आणि शेअर रिक्षेने प्रवास करावा लागतो.
पर्यायी वाहतूक
कल्याण-डोंबिवली परिवहन उपक्रमाने सकाळी आठ ते सकाळी दहा वाजेपर्यंत तसेच सायंकाळी आठ ते रात्रौ दहा वाजेपर्यंत कल्याण-डोंबिवलीतील प्रत्येक रिक्षा वाहनतळाच्या बाजूला दोन मिडी बसची वाहतूक सेवा सुरू केली तर प्रवाशांची सोय होईल. रिक्षा चालकांच्या मनमानीला आळा बसेल. डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्याला केडीएमटीची मीडी बस सुरू आहे. या बसला प्रवाशी चांगला प्रतिसाद देतात. अशा प्रकारची सेवा डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौक, रामनगर पोलीस ठाण्यापासून परिसरात सुरू केली तर प्रवाशांच्या रिक्षा वाहनतळावरील रांगा कमी होण्यास मदत होईल. मनसेचे परिवहन समिती सभापती राजेश कदम यांनी या विषयात लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.