विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत तसेच तहसील कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी निवडणूक कामात अडकल्याने तहसील कार्यालयातील कामकाजावर झालेल्या परिणामाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला असून रविवारी मतमोजणी होऊन निकाल लागल्यानंतरच खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा तहसील कार्यालयाचे कामकाज सुरू होईल, अशी माहिती तहसीलमधील कर्मचाऱ्यांनी दिली आहे. तोपर्यंत मात्र सर्वसामान्यांना नागरिकांना पाहावी लागणार आहे.
निवडणुकीच्या कामकाजासाठी तहसील कार्यालयातील बहुतांशी कर्मचारी कामाला लागले होते. त्यामुळे तहसील कार्यालयातून चालणारे कामकाज गेले १५ दिवस ठप्पच होते. तहसीलमध्ये विविध प्रकारचे प्रतिज्ञापत्र, दाखले यासाठी ग्रामीण भागातून नागरिक येतात. या नागरिकांना निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवसापासूनच अडविण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे अनेकांचा वेळ व पैसाही फुकट गेला होता. अर्ज दाखल करताना गर्दी केली जात असल्याने ११ ते ३ या कामाच्या वेळेतच तहसीलमध्ये काम घेऊन येणाऱ्यांना प्रवेश न मिळाल्याने अनेकांची कामे रखडून पडली आहेत. उरण तालुक्यातील संदीप पाटील यांनी १५ दिवसापूर्वी शेतकरी असल्याचा दाखला मिळावा म्हणून अर्ज केला आहे. अशा प्रकारचे १५० पेक्षा अधिक अर्ज आले असून त्यांची चौकशी करून दाखले देणारे ग्रामसेवक, तलाठी निवडणुकीच्या कामकाजात अडकल्याने दाखले मिळू शकलेले नाहीत. याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसला आहे. त्यामुळे निवडणूक काळात तहसीलमधील नियमित कामे सुरळीतपणे सुरू ठेवावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.