प्रख्यात इंग्रजी नाटककार जे.बी. प्रिस्ले यांच्या अ‍ॅन इन्स्पेक्टर कॉल्स या नाटकावर आधारित ‘आम्ही सारे सज्जन’ या दोन अंकी नाटकाला यवतमाळकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. राजन टोंगो आणि अशोक आष्टीकर या नाटय़ कलाकारांनी सादर केलेल्या भूमिकांनी प्रेक्षकांना खिळवले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जवाहरलाल दर्डा श्रोतृसभागृहात सादर झालेल्या या नाटकास दाद देण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. एका सुंदर सुस्वभावी तरुणीच्या जीवनाच्या शोकांतिकेला जबाबदार उच्चभ्रू सज्जनांचे ढोंग उघड करणारे अत्यंत उत्कंठावर्धक असलेल्या जे.बी. प्रिस्ले यांच्या नाटकाच्या आधारे धावते भाषांतर राजन टोंगो यांनी केले आहे. नाटकाचे नेपथ्य विनायक निवल, निरज खराबे, पाश्र्वसंगीत सिध्दार्थ, रंगभूषा प्रशांत गोडे, वेशभूषा सायली चावरकर, रंगमंच प्रेम निनगूरकर, निर्मिती सहाय्य धिरज गडदे, चतन्य पांडे यांचे असलेल्या या नाटकात मुख्य कलाकार राजन टोंगो, अशोक आष्टीकर, श्रोती क्षीरसागर, अल्का ढोले, पुष्कर सराड, केतन पळसकर, ऋषीकेश निवल, शितल मोहनापुरे, मुक्तीका वाटखेडकर यांच्या भूमिकांना श्रोत्यांनी दाद दिली. नाटकाचे दिग्दर्शन अशोक आष्टीकर यांचे होते. हे नाटक राज्य नाटय़ स्पध्रेत कसोटीला उतरेल, असा विश्वास अरिवद तायडे, राजेश्वर निवल यांनी याप्रसंगी वक्त केला. अस्मिता रंगायत या हौशी नाटय़ संस्थेने हे नाटक रसिकांसाठी विनाशुल्क सादर केले.