मंगळवारपासून सुरू होणारा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा तसेच विजयादशमीनिमित्त दीक्षाभूमीसह शहरात सात हजाराहून अधिक पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे.
शुक्रवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा व विजयादशी हे दोन प्रमुख कार्यक्रम विविध भागात साजरे होतील. नागपूर शहराला सदोदित असलेला दहशतवादी व नक्षलवाद्यांचा धोका लक्षात घेता पोलीस व संपूर्ण प्रशासनाला सुरक्षेचे कटाक्षाने पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दीक्षाभूमी व परिसरात तसेच शहराच्या विविध भागात पोलीस तैनात केले जातील. दीक्षाभूमी परिसरात सहपोलीस आयुक्त व अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली अडीच हजाराहून अधिक पोलीस सुरक्षेची जबाबदारी सांभाळतील.
दीक्षाभूमी परिसरात पोलिसांचा अस्थायी नियंत्रण कक्ष तयार होत असून तेथे अद्यावत संपर्क यंत्रणा उपलब्ध करून दिली जात आहे. मुख्य कार्यक्रमस्थळ, दीक्षाभूमी तसेच स्तुपात धातुशोधक यंत्राने तपासणी झाल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी धातुशोधक यंत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ठिकठिकाणी सी.सी. टीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. साध्या वेषातील महिला-पुरुष पोलीस दीक्षाभूमी व त्या बाहेरील परिसरावर बारकाईने लक्ष ठेवतील. बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच श्वान पथक चोवीसही तास तैनात राहणार असून निरंतर तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या परिसरात स्टॉलवरील प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक माहिती नोंद करून फोटो ओळखपत्र देण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
दीक्षाभूमीच्या शंभर मीटर परिघात खाद्य पदार्थ तयार करण्यास मनाई असून ते तपासणीअंतीच नेता येतील. परिसरात येणाऱ्या बांधवांनी लहान मुलांच्या खिशात त्यांचे नाव, संपर्क क्रमांक व पत्ता लिहिलेली चिठ्ठी ठेवावी. मौल्यवान वस्तू आणू नये, संशयित हालचाली दिसल्यास १०० क्रमांक अथवा पोलिसांना कळवावे. वाहतूक पोलिसांनाही तैनात केले जाणार आहे. रहाटे कॉलनी ते लक्ष्मी नगर, निरी कॉलनीमागील रस्ता, काचीपुरा ते दीक्षाभूमी, काचीपुरा ते बजाज नगर चौक, लक्ष्मीनगर ते रहाटे कॉलनी आदी रस्ते वाहनांसाठी गुरुवारी सकाळी ६ ते शनिवारी मध्यरात्रीपर्यंत बंद राहतील. काचीपुरा चौक ते बजाजनगर हे दोन्ही रस्ते बस स्थानकासाठीच राहील.
विजयादशमीला कस्तुरचंद पार्क, समर्थ नगर, चिटणीस पार्क, राजाबाक्षा, आशीर्वाद नगर, पारडी, कोराडी आदींसह अनेक ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम होतात. विविध मंदिरांमध्ये नागरिकांची गर्दी असते. शहरातील कोराडी, आग्याराम देवी, साई मंदिरसह विविध मंदिर परिसरातही पोलीस तैनात राहतील. पोलीस पथके गस्त घालतील. पोलिसांसह पाचशेहून अधिक होमगार्ड्स तैनात राहतील.
धम्मचक्र प्रवर्तन कार्यक्रमासाठी येणाऱ्यांनी त्यांची वाहने हिस्लॉप महाविद्यालयाचे हॉकी मैदान, यशवंत स्टेडियमसमोरील मॉरिस कॉलेज मैदान, हडस हायस्कुल, आयएमए हॉल, धरमपेठ हायस्कुल, काँग्रेसनगरमधील होमगार्डचे मैदान, इंडियन जिमखाना मैदान, न्यू इंग्लिस हायस्कुल, धरमपेठ
वाणिज्य महाविद्यालय, बजाजनगरातील बास्केटबॉल मैदान, लक्ष्मीनगरातील परांजपे शाळा, लक्ष्मीनगरातील सायंटिफिक गृहनिर्माण सहकारी सोसायटीचे मैदान येथे ठेवावी.