दसऱ्याच्या सणाला आपटय़ाचा पानाला थेट सोन्याची उपमा दिली जाते. दसऱ्याचे हे सोनं लुटण्याची परंपरा या सणाचे वैभव आणखी वाढवते. आपटय़ाची पाने देऊन सोनं घ्या म्हणत हा सण साजरा करण्याची मजा काही औरच. आधुनिक काळातही या पानाचे महत्त्व कायम राहिले. मात्र काळाच्या ओघात या पानांसाठी थेट झाडांची कत्तल करायची, झाडांमधून ती ओरबडायची वृत्तीही वाढीस लागली आहे. ज्या दिवशी आपटय़ाच्या पानाचा मान असतो त्याच दिवशी त्याची अपरिमीत हानी केली जाते. हा प्रकार कल्याणातील तरुणाईला खटकू लागला आहे. याविषयीच्या अस्वस्थतेतून कल्याणच्या इको ड्राइव्ह यंगस्टर या तरुणांच्या समूहाने पर्यावरण स्नेही दसरा साजरा करण्यासाठी जागृती मोहीम आखली असून पाने तोडून उत्सव साजरा करू नका असा संदेश देत दसऱ्याच्या दिवशी आपटय़ांच्या झाडांचे वृक्षारोपण करत हे तरुण सण साजरा करणार आहेत. सण, उत्सवातील पर्यावरणाचा विचार करत पर्यावरण स्नेही उत्सव साजरा करण्यासाठी कल्याणचा इको ड्राइव्ह यंगस्टर गेली दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील आहे. ६० जणांच्या या चमूने आत्तापर्यंत जागतिक चिमणी दिवस, वटपौर्णिमा उत्सव, जागतिक पर्यावरण दिन असे पर्यावरणाची काळजी वाहणारे दिवस उत्सवाप्रमाणे साजरा करण्यास सुरुवात केली आहे. पर्यावरण जागृती हा या मंडळींचा मुख्य उद्देश आहे. दसऱ्याच्या दिवशी शहरात फेरीवाल्यांकडे दिसणारे आपटय़ाच्या पानांची विक्री आणि त्यासाठी होत असलेल्या झाडांची तोड ही बाब या तरुणांना खटकली. संस्थेचा महेश बनकर याने या निमित्ताने आपटय़ांच्या झाडांची माहिती करून घेतली असता, आपटय़ाच्या एका झाडाची वाढ होण्यासाठी चिंचेच्या झाडापेक्षाही अधिक कालावधी लागत असतो. मुंबई, उपनगरामध्ये विक्रीसाठी येणाऱ्या आपटय़ांच्या पानांसाठी झाडांची अक्षरश: कत्तल केली जाते. कशाही पद्धतीने पाने ओरबाडल्याने झाडाची वाढ कमी होऊन ती झाडे खुरटी बनतात. तर काही झाडे मरून जातात. ही बाब समोर आल्यानंतर या मंडळींनी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. संस्थेच्या वतीने आपटय़ाची पाने तोडून दसरा साजरा करू नका, अशी जागृती करण्यास सुरुवात करण्यात आली असून सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून हा संदेश देण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. दसऱ्याच्या दिवशी सकाळी कल्याण शहरातील ३० वेगवेगळ्या ठिकाणी ते आपटय़ाच्या झाडांचे रोपण करणार असून त्याची वाढवण्याची देखील जबाबदारी प्रत्येक जण घेणार आहेत. तर कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात याबद्दल जागृतीपर पथनाटय़ हे तरुण सादर करणार आहेत.
आपटय़ाचं महत्त्व लोकांसमोर ठेवणार..
श्रीलंका, चीन आणि भारतामध्ये आपटय़ांची झाडे आहेत. भारतात प्रामुख्याने पंजाब, आसाम, बंगाल, महाराष्ट्र, मध्यप्रदेशमध्ये या वृक्षांचे प्रमाण मोठे आहे. आयुर्वेदामध्ये आपटय़ाच्या पानाचे मोठे महत्त्व असून अनेक आजारांवर रामबाण उपाय म्हणून आपटय़ाचा उपयोग होतो. हे महत्त्व लोकांपर्यंत पोहचवून त्यांना झाडे तोडण्यासाठी परावृत्त करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत, असे महेश बनकर याने वृत्तान्तशी बोलताना सांगितले. आपटय़ाचे वृक्षारोपण करण्यासाठी विशेष मोहीम आखली जात असून कल्याणातील काही मैदाने त्यासाठी उपयोगात आणता येतील का याचा अभ्यास केला जात आहे. आपटय़ाची काही रोपं या तरुणांनी विकत आणली असून कल्याणातील काही महिला संस्था, वसाहतींनाही या रोपांचे वाटप केले जात आहे. दसऱ्याच्या दिवशी अधिकाधिक प्रमाणात वृक्षरोपण व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.