कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत एकूण ३५० रुग्णालये आहेत. या रुग्णालयांमधील जैव वैद्यकीय कचरा उचलण्यात गेल्या दोन महिन्यांपासून महापालिकेच्या ठेकेदाराकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. डोंबिवलीच्या काही भागात गेल्या सात दिवसांपासून जैविक कचरा उचलला जात नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी डॉक्टरांनी महापालिकेकडे केल्या आहेत.
गेल्या दहा वर्षांपासून शहरातील रुग्णालयांमध्ये तसेच लहान-मोठय़ा क्लिनिकमधून निघणारा वैद्यकीय कचरा मे.पी.आर.एस. एजन्सीमार्फत नियमितपणे गोळा केला जात असे. या एजन्सीच्या कामाविषयी डॉक्टरांमध्ये समाधानाचे वातावरण होते. राजकीय दबावतंत्रामुळे महापालिका प्रशासनाने मे.पी.आर.एस. एजन्सीचा ठेका दोन महिन्यांपूर्वी रद्द केला. हा ठेका नागपूरच्या मे.एस.एम.एस. एजन्सीला देण्यात आला आहे. हा ठेका देण्यासाठी सत्ताधारी पक्षातील एका वजनदार नेत्याने महापालिकेतील स्थानिक पदाधिकारी, अधिकाऱ्यांवर दबाव वाढविल्याचे बोलले जाते. मे.एस.एम.एस. एजन्सीला ठेका देऊन दोन महिने उलटले तरी महापालिका प्रशासनाने या ठेकेदाराबरोबर कोणत्याही प्रकारचे करार केलेले नाहीत, असे महापालिका सूत्रांनी सांगितले. त्यामुळे जैविक कचऱ्याच्या वाहतुकीचा मोठा प्रश्न निर्माण झाला असून वैद्यकीय क्षेत्रातील व्यावसायिक कमालीचे नाराज झाले आहेत. रुग्णालयातील कचऱ्याचे वजन करून किलोमागे ठरावीक दर यापूर्वी आकारण्यात येत असे. नवीन ठेक्याप्रमाणे रुग्णालयातील खाटांप्रमाणे दरमहा चारशे रुपयांहून अधिक दर आकारण्यात आला आहे. डॉक्टरांमध्ये त्यामुळे नाराजी आहे. काही दिवसांपूर्वी इंडियन मेडिकल असोसिएशनचे शिष्टमंडळ महापालिका आयुक्त रामनाथ सोनवणे यांना भेटले होते. आयुक्त सोनवणे यांनी याप्रकरणी सामंजस्याची भूमिका घेऊन तोडगा काढण्याचे आश्वासन डॉक्टरांना दिले होते. महापालिकेने जैव वैद्यकीय कचरा उचलणाऱ्या ठेकेदाराबरोबरचा करार पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात नोंदणी करायची असते. त्यानंतर महापालिका प्रशासन प्रत्येक डॉक्टरसोबत जैव कचरा खरेदीविषयक एक करार करते. असा नियम असताना महापालिका प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ थेट ठेकेदाराला कचरा उचलण्यास परवानगी देत आहेत. हे नियमबाह्य़ आहे, असा डॉक्टरांचा आक्षेप आहे. घनकचरा विभागाचे उपायुक्त अनिल डोंगरे बैठकीत व्यस्त असल्याने त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
 रुग्णालयात पिशव्यांचे ढीग
ठेकेदाराने रुग्णालयातील जैव वैद्यकीय कचरा उचलला नाही. त्यामुळे सात दिवसांपासून जैव कचऱ्याच्या पिशव्या रुग्णालयात बांधून ठेवण्यात आल्या आहेत. या पिशव्या वाढत चालल्याने ठेवायच्या कोठे असा प्रश्न निर्माण झाल्याचे काही डॉक्टरांनी सांगितले. महापालिकेच्या हेल्पलाइनला याबाबत दूरध्वनी केला की अनेक वेळा संपर्क होत नाही, असे काही डॉक्टरांनी स्पष्ट केले.