ठाणे महापालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे अद्यापही शहरात वाहन पार्किंगसाठी सुविधाच उपलब्ध नसल्याने ठाणेकर रस्त्यांवर वाहने उभी करतात. परिणामी, वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वाहनतळांच्या नियोजनाकडे पाठ फिरविणाऱ्या महापालिकेने शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये मोठय़ा प्रमाणावर पार्किंग क्षेत्र निर्माण करण्याचा प्रयत्न सुरूही केला आहे. मात्र, अशा प्रकारे वाहनतळांच्या निर्मितीसाठी पुरेशी जागाच उपलब्ध नसल्याने रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांना पार्किंग टॅक्स आकारून ‘दुधाची तहान ताकावर’ भागविण्याचे उद्योग ठाण्यातील गल्ली- कोपऱ्यामध्ये महापालिकेने सुरू केले आहेत.
रस्त्यांच्या कडेला जेथे पार्किंग क्षेत्र आरक्षित नाही, तेथे वाहने उभी करणाऱ्या चालकांविरोधात वाहतूक पोलीस कारवाई करतात. मात्र, या कारवाईमुळे ठाणेकर आणि वाहतूक पोलिसांमध्ये ‘तू तू मै मै’ होत असल्याचे चित्र शहरात पाहावयास मिळते. तसेच, ‘आधी पार्किंगची सुविधा द्या, मगच कारवाई करा’, अशी मागणी करीत ठाणेकर हुज्जत घालताना दिसतात. ठाणे शहरामध्ये सुमारे १५ लाख वाहनांची नोंद असून त्यामध्ये सुमारे दोन लाख दुचाकी तर उर्वरित चारचाकी वाहने आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने वाहनांचा राबता असतानाही शहरात दोन लाख वाहने उभी राहतील एवढीही क्षमता येथील पार्किंग व्यवस्थेत नाही, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. वाहतूक पोलिसांच्या म्हणण्यानुसार, शहरातील महत्त्वाच्या नाक्यांवर वाहनांची कोंडी होण्यामागे अरुंद रस्ते जसे कारणीभूत आहेत, तितकेच रस्त्यांच्या कडेला उभ्या राहणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होत आहे.
ठाणे शहरातील बहुतेक रस्ते अरुंद असून त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव राहिलेला नाही. या रस्त्यांवर वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. गेल्या काही वर्षांत ठाणे शहराचा झपाटय़ाने विकास झाला असून शहरात मोठमोठे प्रकल्पही राबविण्यात आले. ठाणे स्थानक परिसरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी सॅटीस तयार करण्यात आला. मात्र, त्यानंतर वाहतूक व्यवस्थेशी निगडित असा एकही प्रकल्प हाती घेण्यात आलेला नाही. ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांचा आवाका लक्षात घेता येथील रेल्वे स्थानक परिसरातील वाहनतळांची क्षमता अतिशय अपुरी आहे. या स्थानकांमध्ये लाखो प्रवासी ये-जा करीत असतात. त्यांना वाहने कुठे उभी करायची असा प्रश्न भेडसावत आहे. सॅटीस प्रकल्पावर कोटय़वधी रुपये खर्च करणाऱ्या महापालिकेला स्थानक परिसरातील वाहनतळाचे नियोजन करण्याची दूरदृष्टी दाखविता आलेली नाही. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसर वाहतूक कोंडीचे आगर बनले आहे.