कोकण भूमी प्रतिष्ठानच्या जीवावर सात लाख ग्राहक येण्याचा दावा करण्यात आलेल्या नवी मुंबई येथील सानपाडय़ातील चार दिवसाच्या प्रदर्शनात केवळ मंदीचेच दर्शन घडले. नवी मुंबई बिल्डर असोसिएशनच्या वतीने करोडो रुपये खर्च करुन दरवर्षी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात एक ते दीड लाख ग्राहक आल्याचा अंदाज विकासक व्यक्त करीत असून या ग्राहकांमधून भविष्यात ७० ते ९० कोटी रुपये किंमतीची घरे विकली जातील, असे दिसून येते. बिल्डर असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र एक हजार कोटीचा धंदा झाल्याचा डिंगोरा पिटण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी दोन पदाधिकाऱ्यांना पटवून सांगता सभारंभात आपली मत मांडण्याची संधीही देण्यात आली होती.
कोकण भूमी प्रतिष्ठान आणि बिल्डर असोशिएशन ऑफ नवी मुंबई या दोन संघटनांच्यावतीने सानपाडा येथे कोकण महोत्सव आणि मालमत्ता प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या दोन्ही कार्यक्रमांची सांगता मंगळवारी संध्याकाळी पालकमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत झाली. देशात आर्थिक मंदीचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होऊ लागले आहे. त्याची छायाही या मालमत्ता प्रदर्शनावर होती. त्यामुळे २०० पेक्षा जास्त विकासकांनी आपल्या घरांची विक्री या प्रदर्शनात मांडूनही सरासरी एक कोटीचा व्यवसायही झालेला नाही. आयोजकांच्या वतीने हे प्रदर्शन लाभल्याचा कांगावा केला जात असून तो किती फोल असल्याचे ग्राहक भेटीवरुन दिसून येते. किती ग्राहक आल्याची अधिकृत नोंद नाही पण पोलिसांच्या अंदाजानुसार चार दिवसात दोन्ही ठिकाणी दोन लाख ग्राहक आल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यात दोन्ही ठिकाणी येणारे ग्राहक हे पूर्णपणे वेगळे असून महोत्सवात येणाऱ्या ग्राहकांनी घरे आरक्षण करण्याचा प्रश्न येत नाही. मालमत्ता प्रदर्शनात येणाऱ्या ग्राहकांनी मात्र महोत्सवात जाऊन खरेदी केल्याचे दिसून येत होते. कोकण भूमी प्रतिष्ठानच्या आयोजकांच्या वतीने सात लाख ग्राहक भेट देतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याचवेळी या कार्यक्रमांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक कॅबिनेट मंत्री, ५० आमदार, विरोधी पक्षनेते, शिवसेना,मनसे प्रमुख येणार असल्याची आवई उठविण्यात आली होती. यापैकी एकानेही या कार्यक्रमांना हजेरी लावली  (अधिवेशनाला सुट्टी असताना) नाही. लोकप्रिय सिने कलावंत तसेच क्रीडापटू येणार असल्याचीही वल्गनाही फोल ठरली. त्यामुळे उद्घाटनाला कार्यक्रमाला आलेले शरद पवार, सुनील तटकरे, आणि उदय सामंत याशिवाय कोणत्याही बाहेरच्या नेत्याने हजेरी लावली नाही. त्यामुळे हे दोन्ही संपूर्ण कार्यक्रम राष्ट्रवादीने हायजॅक केल्याची चर्चा होती.
कनिष्ठ मध्यमवर्गीयांची खोपोलीला पसंती
मालमत्ता प्रदर्शनात काही प्रमाणात छोटी घरे विकल्याचे दिसून आले. नवी मुंबई, पनवेल, मध्ये घरे न परवडणाऱ्या ग्राहकांनी खोपोलीला अधिक पसंती दिली आहे. त्यामुळे खोपोली परिसरातील विकासकांनी अधिक भाग घेतला होता. घरांच्या कर्जासाठी ग्राहकांच्या प्रतिक्षेत असणाऱ्या दहा-बारा बँकानी या प्रदर्शनात ठाण मांडले होते. यात स्टेट बँकेने तर चार स्टॉल लावल्याचे दिसून आले. दोन कोटीच्या खर्चात एक कोटीचा नफा पदरात पडत असल्याने बिल्डर असोशिएशन असे प्रदर्शन आयोजित करण्यात रस दाखवीत असल्याचे कळते पण यावर्षी कोकण भूमी प्रतिष्ठानने लाखो रुपये ( यात मंडपाचा खर्च जास्त आहे) पदरात पाडून घेण्यासाठी बिल्डर संघटनेला तोंडघशी पाडल्याची चर्चा विकासकांमध्ये आहे.