नवी दिल्लीतील विद्युत अपिलीय प्राधिकरणच्या आदेशानुसार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने शैक्षणिक संस्था, दवाखाना, वाचनालय आदी सार्वजनिक सेवा देणाऱ्या ग्राहकांचा स्वतंत्र वर्ग आणि त्यांचे व्यापारी वीज दरापेक्षा कमी दर एक ऑगस्ट २०१२ पासून निश्चित केलेले आहेत. तथापि, महावितरण अद्यापही अशा अनेक ग्राहकांकडून व्यापारी दराने जादा देयकांची वसुली करून या ग्राहकांची फसवणूक करीत असल्याची तक्रार महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे आणि प्रा. शाम पाटील यांनी केली आहे. अशा संबंधित ग्राहकांनी त्वरित संबंधित कार्यालयाकडे सार्वजनिक सेवा वीज दरातंर्गत देयक देण्यात यावे म्हणून व जादा जमा रकमेचा परतावा मागणीसाटी अर्ज करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
सार्वजनिक सेवा लघुदाब १० अथवा उच्चदाब नऊ या नवीन वर्गामध्ये शाळा, महाविद्यालय आदी सर्व शैक्षणिक संस्था, रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, पॅथॉलॉजी केंद्र्, पोलीस ठाणे, टपाल कार्यालय, सार्वजनिक वाचनालय, अभ्यासिका, रेल्वे आणि एसटी कार्यालये व कार्यशाळा, अग्निशमन केंद्र, कारागृह, न्यायालय आदी सार्वजनिक सेवांचा समावेश आहे. अद्यापही या वर्गातील अनेक ग्राहकांवर व्यापाऱ्यांकडून जादा दराने आकारणी सुरू आहे. त्यातील तपशील लघुदाब अंतर्गत शून्य ते २० किलोवॉटसाठी २०० युनिटपर्यंत व्यापाऱ्यांकरिता ५८५ पैसे युनिट तर सार्वजनिककरिता ५३६ पैसे युनिट. आणि २०० युनिटपेक्षा अधिकसाठी व्यापाऱ्यांकरिता ८३८ पैसे युनिट तर सार्वजनिककरिता ७८८ पैसे युनिट असा आहे. याप्रमाणेच २० ते ५० किलोवॉट तसेच उच्च दाबअंतर्गत एक्स्प्रेस फिडर्स व बिगर एक्स्प्रेस फिडर्स विभागात व्यापारी तसेच सार्वजनिक सेवांकरिता दरांमधील फरक आहे.
अद्यापही अशा सार्वजनिक सेवा देणाऱ्या ज्या वीज ग्राहकांना व्यापारी दराने देयक येत आहेत, त्यांनी संबंधित कार्यालयाकडे सार्वजनिक सेवा वीज दर लागू करण्यासाठी मागणी करावी. तसेच एक ऑगस्ट २०१२ पासून जादा घेतली गेलेली रक्कम देयकाव्दारे परत करण्याची मागणी करावी. नमूना अर्जासाठी तसेच आवश्यक असल्यास अधिक माहितीसाठी आपल्या भागातील स्थानिक वीज ग्राहक संघटनेच्या कार्यालयाकडे अथवा सचिव वर्धमान सिंघवी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रा. शाम पाटील, शरद कांबळे, गो. पि. लांडगे आदिंनी केले आहे.