आशिया खंडातील सर्वात मोठे वैद्यकीय केंद्र असलेल्या मेडिकल रुग्णालयात पावसाळ्याच्या दिवसात मोठय़ा प्रमाणात अस्वच्छता पसरली असून रुग्णांना त्याचा त्रास होत आहे. त्यामुळे रुग्णालय परिसरात घाण करणाऱ्यांना दंड ठोठावण्याचा निर्णय मेडिकल प्रशासनाने घेतला असून वैद्यकीय अधीक्षकांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छता समिती स्थापन करण्यात आली आहे.
या रुग्णालयात संपूर्ण आशिया खंडातून हजारो रुग्ण रुग्ण उपचारासाठी येत असतात. सर्वाधिक रुग्ण ग्रामीण भागातून येणारे असून स्वच्छतेच्या नियमांचे रुग्णांच्या नातेवाईकांकडून सर्रास उल्लंघन केले जात असल्याने मोठय़ा प्रमाणात घाणीचे साम्राज्य माजले आहे. सफाई कर्मचारी रोज ही घाण साफ करीत असले तरी कर्मचाऱ्यांची संख्या मर्यादित असल्याने संपूर्ण परिसर स्वच्छ ठेवणे शक्य होत नाही. यासाठी परिसरात कचरा फेकणाऱ्यांवर लगाम कसणे आवश्यक झाल्याने दंडाची कारवाई आता सुरू झाली आहे.
मेडिकलमध्ये स्वच्छता राखण्यासाठी शासनाकडून निधी मिळतो. या निधीचा उपयोग प्रशासन मेडिकल परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी खर्च केला जातो. तरीही रुग्ण व त्यांचे नातेवाईक गुटखा खाऊन मेडिकलच्या भिंती रंगवतात. त्यामुळे सर्वत्र अत्यंत वाईट चित्र दिसू लागले आहे.
 मेडिकलमध्ये असलेल्या दुर्गधीमुळे रुग्णांना त्याचा त्रास होतो. मेडिकल परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी ठिकठिकाणी कचराघर, पिकदाणी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र लोकांमध्ये जागृती नसल्यामुळे मिळेल त्या जागी घाण केलेली दिसून येते.
मेडिकल प्रशासनाने स्वच्छतेचा मुद्दा अत्यंत गंभीरपणे हाताळण्याचे ठरवले असून यासंदर्भात अधिष्ठाता आणि सर्व विभाग प्रमुखांची नुकतीच बैठक झाली. त्यात रुग्णालयात घाण आणि अस्वच्छता करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. घाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वच्छता विभाग समिती तयार करण्यात आली असून रोज वेगवेगळ्या वॉर्डात आणि विभागात फेरफटका मारून पाहणी करणार आहे. त्यासाठी महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांची मदत घेतली जाणार आहे. दंड आकारण्यासंदर्भात प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. वासुदेव बारसागडे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. अपूर्व पावडे यांच्या स्वाक्षरीने दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती मेडिकल प्रशासनाने दिली.