संपलेल्या वर्षांत रेल्वेचे ‘गुडीगुडी’
आधुनिक काळाची गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने संपलेल्या वर्षांत अनेक उपयुक्त उपक्रम हाती घेऊन पूर्ण केले आहेत. यामुळे प्रवाशांना सुविधा मिळण्यासोबतच रेल्वेस्थानकांचे रूप पालटण्यास मदत झाली आहे.
विभागीय रेल्वे व्यवस्थापक बृजेश दीक्षित यांच्या पुढाकाराने नागपूर विभागात अनेक चांगल्या योजना राबवण्यात आल्या. नागपूर स्थानकावर महिलांसाठी द्वितीय श्रेणी प्रतीक्षालय सुरू करण्यात आले. ‘विदर्भाची लाडकी’ म्हटल्या जाणाऱ्या सेवाग्राम एक्सप्रेसमध्ये प्रवाशांकरता अनेक सोयी उपलब्ध करून देण्यात आल्या. पूर्वी आठवडय़ातून तीन दिवस धावणारी आणि प्रवाशांची मागणी असलेली नागपूर- मुंबई दूरांतो एक्सप्रेस आता दररोज धावू लागली आहे. अपघात टाळण्यासाठी मानवरहित रेल्वे फाटकांवर सूर्योदय ते सूर्यास्त या काळात सुरक्षा सल्लागार नेमण्याचा पहिला प्रयोग देशात नागपूर विभागातच करण्यात आलेला आहे. नागपूर रेल्वे स्थानकावरील संत्रा मार्केटकडील पूर्व द्वाराच्या सौंदर्यीकरणाची योजना तयार करण्यात आली असून त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. गाडीतून उतरून थेट फलाटावर जाता येईल अशी सोय असलेला ‘होम प्लॅटफॉर्म’ही बांधण्यात येत असून त्याचे भूमिपूजन करण्यात आले आहे. अजनी रेल्वेस्थानकाच्या सौंदर्यीकरणाची योजना हाती घेण्यात आली असून त्याचे कामही पूर्ण होत आले आहे. धामणगाव रेल्वे स्थानकाचाही कायापालट करण्यात आला आहे. बल्लारशाह येथे गाडीतील प्रवाशांना भोजन पुरवण्यासाठी ‘बेस किचन’ सुरू झाले आहे.
रेल्वे रूट इंटरलॉकिंग (आरआरआय) चे महत्त्वाकांक्षी काम विक्रमी वेळात यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. याच वर्षांत अमरावती- नरखेड हा नवा रेल्वे मार्ग वाहतुकीसाठी खुला झाला. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुबोध जैन यांनी नागपूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात हेरिटेज लोको स्टीम इंजिनची स्थापना केली, तसेच गाडय़ा धुतल्या जाण्याची सोय असलेल्या अजनी येथील कोचिंग काँप्लेक्सचे उद्घाटन केले.  यावर्षी नागपूर रेल्वेस्थानकासह विभागातील अतर काही स्थानकांवर रेड रिबन एक्सप्रेस, संस्कृती एक्सप्रेस प्रदर्शन व सायन्स एक्सप्रेस नागरिकांना पाहण्यासाठी आल्या होत्या. २०११- १२ या वर्षांसाठीची प्रतिष्ठित महाव्यवस्थापक दक्षता शील्ड नागपूर विभागाला यावर्षी मिळाले.
यावर्षी एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाला प्रवासी वाहतुकीतून १४४२.५३ कोटी रुपयांची, तर मालवाहतुकीतून ११९८.८९ कोटी रुपयांची मिळकत झाली, जी गेल्यावर्षीच्या याच काळापेक्षा अनुक्रमे २९ टक्के व ३३.५ टक्क्यांनी जास्त आहे.  याच काळात विनातिकीट प्रवाशांच्या विरोधात मोहीम राबवून वाणिज्य विभागाने ५ कोटी ५८ लाख रुपयांचा दंड वसूल केला. याच वर्षी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दोनवेळा पेन्शन अदालतही आयोजित करण्यात आली होती.