विघ्नहर्ता श्री गणेशाचे आर्णीत मोठय़ा उत्साहात स्वागत करण्यात आले. पावसाची रिमझिम सुरू असताना या उत्साहात अधिकच भर पडली. आर्णीत यावर्षी २५ पेक्षाही जास्त गणेश मंडळांनी गणेशाची आनंदात स्थापना केली.
आर्णीचा राजा म्हणून ओळख असलेल्या अंकुश गणेश मंडळाच्या गणेश स्थापनेसंदर्भात रजत महोत्सव मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या मंडळाच्या गणेशाची प्रतिष्ठापना करताना काढण्यात आलेल्या शोभायात्रेत पुणे येथील प्रसिद्ध झांझ पथकाला आमंत्रित करण्यात आले होते. बाप्पाच्या आगमनाप्रीत्यर्थ मंगळवारपासून धार्मिक, सांस्कृतिक, तसेच समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमांसह संगीतमय भागवत सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे गणेश भक्तांना या कार्यक्रमाची आगळीवेगळी मेजवानी मिळणार आहे.
गणेशाचे आगमन होताना रिमझिम पावसाने उत्साहात भर टाकली असली तरी वीज प्रवाह खंडित झाल्याने मात्र गणेश मंडळाच्या उत्साहावर अंधाराचे सावट निर्माण झाले होते; परंतु वीज वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भरपावसात काम करून रात्री १० वाजता वीजप्रवाह सुरू करण्यात यश मिळवले. त्याचप्रमाणे ठाणेदार सर्जेराव गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवून वीज त्वरित सुरू व्हावी, यासाठी प्रयत्न केले. गणेश उत्सव साजरे होत असताना वीज वितरण विभागाने सक्रिय असणे गरजेचे आहे. अंकुश गणेश मंडळाला २५ वर्षे पूर्ण होत आले असताना रजत महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचा बोलबाला राहणार आहे. अंधाराचे सावट असले तरी गणेशाच्या आगमनाप्रीत्यर्थ पावसाने हजेरी लावल्याने गणेश भक्तांना, तसेच शेतकऱ्यांनाही मात्र आनंद झाला आहे. ठाणेदार गायकवाड यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून गणेश उत्साह शांततेत साजरा करण्याचे आवाहन त्यांनी गणेश मंडळांना केले आहे.